Maharashtra ZP News : जिल्हा परिषदांवर आता अमर्याद काळासाठी प्रशासक राहणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यामधील प्रशासकाच्या कालमर्यादेसंदर्भातील अट राज्य शासनाने काढली. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसतंय.
परिणामी, निवडणुकीची (Election) आस लावून असलेल्यांच्या उत्साहावर काही काळ पाणी फिरवले आहे. ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका (Municipal Corporation) व जिल्हा परिषदेच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत अध्यादेशही काढला.
प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही प्रस्तावित केली. परंतु नंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेनेचे नेते व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिवसेनेतील ४० आमदार व अपक्षांना घेऊन भाजपच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या कमी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे राज्यातील अनेक महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत.
आठ ते दहा महिन्यांपासून या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यानुसार प्रशासकाची नियुक्ती सहा महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही. परंतु आता शासनाने प्रशासकाची कालमर्यादा निश्चित करणारे कलम ‘९१ ब’ काढून टाकले. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरील प्रशासकाची नियुक्ती अमर्याद काळासाठी राहणार आहे.
प्रशासक कोण?
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९१ ब मध्ये प्रशासक नियुक्तीसंदर्भात अंतर्भूत आहे. जिल्हा परिषदेवर सीईओ तर पंचायत समित्यांवर सीईओंनी प्राधिकृत केलेले अधिकारी प्रशासक असून, सहा महिन्यांचा कालावधी नमूद आहे. पंचायत समित्यांचे प्रशासक साधारणतः गटविकास अधिकारी असतात. परंतु राज्य शासनाने हे कलमच काढले. ११ जानेवारीला याबाबतचा अध्यादेश काढला. त्यामुळे प्रशासकाबाबतही संभ्रम निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.