Yavatmal District News : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या पुसद (Pusad) तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायतीत सरपंचपदी वर्षा देवानंद जांबुतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण सात सदस्यांपैकी चार महिला व एक पुरुष बिनविरोध निवडून आले आहेत. दोन जागा रिक्त आहेत. गेल्या चार निवडणुकांमध्ये चिकणी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळीही परंपरा कायम राहिली.
यंदा सरपंचपद (Sarpanch) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने वर्षा देवानंद जांबुतकर या थेट जनतेतून बिनविरोध निवडून जाणाऱ्या सरपंच ठरल्या. बिनविरोध निवडून आलेल्या महिलांमध्ये कुंताबाई गोदाजी नावडे, कल्पना गजानन कल्हाणे, बेबी बाबुराव कुदळे, सुलक्षणा मारोतराव कुदळे यांचा समावेश असून विजय सोपान वैराळे एकटे पुरुष सदस्य आहेत. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांची केवळ औपचारिक घोषणा तेवढी शिल्लक आहे.
यापूर्वी चिकणी ग्रामपंचायतीमध्ये देवानंद किसन जांबुतकर चार वेळा बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ते पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर चार वेळा सरपंच पदी बिनविरोध निवडून आले. यावेळी १८ डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे. यावेळी सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने देवानंद जांबुतकर यांची पुन्हा सरपंच बनण्याची संधी हुकली. मात्र, गावातील नागरिक व महिला यांच्या आग्रहाखातर देवानंद जांबुतकर यांच्या
अर्धांगिनी वर्षा यांना ही संधी देण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून उषा धनवे कार्यरत आहेत. गावाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग असावा, म्हणून यावेळी सभेत महिलांना पुढे आणण्याचा विचार मांडण्यात आला. त्यानुसार चार सदस्यपदी महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली. वर्षा जांबुतकर यांनी महिलांच्या बचत गट चळवळीत अग्रक्रमाने भाग घेतला आहे. त्यांचा महिलांशी थेट 'कनेक्ट' आहे. त्यामुळे महिलांनीच आरक्षण असल्याने वर्षा जांबुतकर यांना सरपंच पदाची जबाबदारी देण्याचे सभेत ठरविले. सरपंचपदाची जबाबदारी आपण सक्षमपणे सांभाळू, लोकांचे प्रश्न सोडवून गावाचा विकास घडवून आणू, अशी प्रतिक्रिया वर्षा जांबुतकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केली.
चिकणी ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यामुळे ग्रामविकासाच्या निधीची पूर्तता शासनाने करावी, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी चिकणीने स्मार्ट गाव योजनेत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. मात्र त्या बक्षिसाचे वितरण अद्यापही झाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. दैनिक सकाळ ॲग्रोवनच्या सरपंचच मेळाव्यातून मला ग्राम विकासाची प्रेरणा मिळाली. त्याचा उपयोग चिकणी ग्रामपंचायतीला झाला, असे माजी सरपंच देवानंद जांबुतकर यांनी सांगितले.
माझे पती गेल्या चार टर्म मध्ये सरपंच होते. त्यांनी सर्वांना घेऊन चालत गावातील विकास कामांना चालना दिली. मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम, स्वच्छता, शाळा-अंगणवाडी इमारत बांधकाम, नळ योजना, घंटागाडी कचरा व्यवस्थापन, घरकुलांचा लाभ अशा सर्वच कामांमध्ये आघाडी घेतल्याने गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. परंतु यावेळी महिला आरक्षण असल्याने सरपंचपदाची संधी मला दिली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांच्या सहकार्याने चिकणीचा सर्वांगीण विकास हा माझा अजेंडा राहील, असे नवनिर्वाचित सरपंच वर्षा जांबुतकर म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.