Akola West Constituency By Election : अकोला पश्चिममध्ये पोटनिवडणूक झाल्यास 'हे' असतील वंचितचे उमेदवार !

Akola West Constituency : वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमताने ठराव मंजूर.
Nikhil Gawande
Nikhil GawandeSarkarnama
Published on
Updated on

Akola West Constituency By Election : अकोला, गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास निखिल गावंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसा ठराव आज घेऊन ही मागणी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त जागेवर लवकरच निवडणूक जाहीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करीत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय पदाधिकारी निखील गावंडे यांना वंचितने उमेदवारी द्यावी, असा ठराव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी मांडला.

Nikhil Gawande
Akola Politics : क्रिकेटच्या मैदानावरही आंबेडकरांनी दाखवून दिले, आम्ही ‘वंचित’ नाही!

हा ठराव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला आहे. सदर ठरावाची प्रत ही वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारला धक्का देत काही महिन्यांपूर्वी प्रहारचे पदाधिकारी निखिल गावंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीत प्रवेश घेतला होता. अकोला जिल्‍ह्यातील प्रहारच्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या सभापती ठरलेल्या स्मृती गावंडे यांचे निखील गावंडे हे पती आहेत.

गावंडे यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोला जिल्‍ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. त्यांच्याच मतदारसंघात निखिल गावंडे हे वंचितमध्ये गेल्याने ‘प्रहार’मध्ये फुट पडली. त्यामुळे पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी वंचितने अकोला पश्चिम लढणार असल्याची घोषणा केली होती. या मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यास भाजपकडून हा मतदारसंघ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हा मतदारसंघ लालाजी यांनी कायम भाजपचा अभेद्य गड ठेवला.

त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त झाला. अशातच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील होण्यापूर्वीच या मतदारसंघावर दावा केला आहे. लालाजी यांच्या निधनानंतर या मतदारसंघासाठी भाजपकडून गोवर्धन शर्मा यांचे चिरंजीव कृष्णा शर्मा यांना तिकीट दिले जाऊ शकते. तर या मतदारसंघात भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल हेदेखील इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत अद्यापही निवडणूक घोषित न झालेल्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देण्याची व्यूहरचना आखली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे पदाधिकाऱ्यांनी निखिल गावंडे यांना उमेदवारी देण्याची मागणीही करून टाकली आहे. वंचितच्या अकोल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निखिल गावंडे यांच्या नावाची एकप्रकारे घोषणा केली आहे. या ठरावानंतर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे. ग्रामीण भागात पकड असलेल्या गावंडे यांना शहरातून उमेदवारी द्यायची का, असा सवालदेखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

काल (ता. २९) पार पडलेल्या बैठकीला वंचित युवक आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रभा शिरसाट, धीरज इंगळे, संगीता अढाऊ, शोभा शेळके, मजहर खान, गजानन गवई, शंकरराव इंगळे, किशोर जामनिक, पवन बुटे, अशोक दारोकार, चरण इंगळे, गोरसिंग राठोड, जानकीराम खारोडे, सुनील सरदार, अमर डिकाव, संजय बुथ, सिद्धार्थ पळसपगार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com