Vijay Wadettiwar : अनेक दिवसांपासून मार्डच्या डॉक्टरांची मागणी प्रलंबित आहे. मात्र, सरकार त्यावर लक्ष घालायला तयार नाही. आपण हे सरकारच्या लक्षात आणून दिले होते. आरोग्य यंत्रणेकडे टेंडरव्यतिरिक्त सरकार गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. अशात राज्यात जे काही समोर येत आहे, त्यातून आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सामान्य माणसाला जगणे कठीण होणार आहे. मार्डचा हा संप तत्काळ मिटवला गेला पाहिजे. संप मिटविण्यासाठी मध्यस्थी केली गेली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली.
मार्डचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. अशात सरकारने त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. सरकार केवळ आपल्या मस्तीत आहे. डॉक्टरांच्या संपाचा सामान्य रुग्णांच्या सेवेवर वाईट परिणाम होत असल्याचे सरकारला दिसत नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. सरकार जर हा संप सोडविण्यात असमर्थ ठरत असेल, तर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची शेवटची बैठक 27 तारखेला होणार आहे. केवळ सहा ते सात जागांचा प्रश्न उरला आहे. बाकी सगळे जवळपास निश्चित झाले आहे. दहापैकी किमान सहा जागा काँग्रेसला मिळतील. यात थोडे कमी-जास्त होऊ शकते. मला विचारले आहे की तुम्ही लोकसभेला निवडणूक लढणार का? तर मी म्हटले आहे की हे पक्षश्रेष्ठी जे ठरवतील. जे पक्ष ठरवेल ते मी करेल. पक्षाने जर ठरवले की विजय वडेट्टीवार यांना लोकसभा निवडणुकीत लढवायचे, तर तसे मी करणार आहे. काँग्रेस पक्षात सगळे योग्य पद्धतीने ठरते. पक्ष कोणालाही उमेदवारी देत नाही. जिंकण्याची क्षमता असेल तरच ती दिली जाते, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटलांच्या शब्दात आता काही दम राहिलेला नाही. सरकारने जे दिले आहे, त्यात त्यांनी समाधान मानावे. ‘चॅलेंज’ करणारी भाषा वापरू नये. त्यांच्या भाषेत गर्व दिसत आहे. गुर्मी दिसत आहे. ही गुर्मी दाखविण्याची गरज नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. आता जरांगे यांनी काही करू नये. सरकारने जे दिले आहे, ते आता कोर्टात टिकवण्यासाठी जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता स्वस्थ बसावे. पुढे काय होईल हे जरांगे पाटील यांनी केवळ पाहावे. गुजरातमध्ये पाच-पाच लाखांची सभा घेणारे हार्दिक पटेल यांचे काय झाले, तेच महाराष्ट्रात जरांगे पाटील यांचे होणार आहे. जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रात हार्दिक पटेल होईल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पक्ष फोडले जात आहेत. नेते फोडले जात आहेत. विरोधकांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. भाजपजवळ पैशांचा पूर एवढा आहे की, त्यांनी प्रचारासाठी 95 टक्के हेलिकॉप्टर बुक केले आहेत. विरोधकांना प्रचारासाठी हेलिकॉप्टर मिळूच नयेत, अशी व्यवस्था भाजपने केली आहे. एकीकडे नेते फोडून विरोधकांना हैराण करायचे आणि आता त्यांना प्रचाराला साधनच मिळू नये, अशी व्यवस्था हुकूमशाही पद्धतीने त्यांनी सुरू केली आहे. भाजपने लक्षात ठेवले पाहिजे, लोकांच्या मनात जो राग आहे, तो राग भाजपची हवाई यात्रा करून प्रचार केला तरी तो थांबणार नाही. लोकांच्या संतापाची फळे भोगावीच लागणार आहेत. भ्रष्टाचारातून प्रचंड पैसा सरकारने जमा केला आहे. त्यातून ही प्रचार साधने वापरली जाणार आहेत. त्यांना विचारणारे कोणी नाही. निवडणूक आयोगसुद्धा त्यांच्या मुठीत आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
Rमहाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. ‘हम करे सो कायदा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय होणार ते भविष्यात दिसणार आहे. विरोधकांना प्रचाराला साधनच मिळू नये, असे प्रयत्न सुरू आहेत. आधी काँग्रेसचे खाते गोठविण्यात आले. आता त्यांना हेलिकॉप्टर मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या एजन्सी आहेत, त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. विरोधकांना तुम्ही हेलिकॉप्टर देऊ नये, अन्यथा चौकशी लावण्यात येईल, असे सांगत सगळेच हेलिकॉप्टर भाजपने आपल्या ताब्यात घेतले आहेत. हे चुकीचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.