Raj Thackeray:भाजप नेत्यांच्या सततच्या भेटींचे ‘राज’ काय? ठाकरेंनी घेतली बावनकुळेंची भेट...

काल सकाळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Raj Thackeray at Chandrashekhar Bawankule's Home.
Raj Thackeray at Chandrashekhar Bawankule's Home.Sarkarnama

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे रविवारपासून विदर्भाच्या (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. रविवार आणि सोमवारी नागपूर शहर, ग्रामीण आणि भंडारा, गोंदियातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका त्यांनी आटोपल्या. दरम्यान काल सकाळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाजपच्या (BJP) नेत्यांशी सातत्याने भेटीगाठी होत आहेत. गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज ठाकरे याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. रविवारी नागपुरात पोहोचल्यानंतर काल सोमवारी राज ठाकरे यांनी कोराडी येथील निवासस्थानी जाऊन बावनकुळे यांची भेट घेतली. भाजप आणि मनसे नेत्यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटीगाठी मागचे ‘राज' मात्र गुलदस्त्यातच आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भाजपसोबत युती होणार आहे का, कारण तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत, असे राज ठाकरे यांना काल नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विचारले असता. या वृत्ताचा त्यांनी साफ इन्कार केला. ते म्हणाले, पूर्वी विदर्भ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यांच्याशी संघर्ष करून भाजप सत्तेत आली आणि विदर्भ आज भाजपचा बालेकिल्ला आहे. आम्हीसुद्धा प्रस्थापितांशी संघर्ष करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे भाजपसोबत युतीच्या चर्चेमध्ये काही दम नाही. आम्ही येथे भाजपसोबत लढणार आणि आगामी सर्व निवडणुका लढणार आहे. भेटीगाठींबद्दल विचाराल तर मैत्रीचे संबंध सर्वांशीच आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत १९९२-९३ सालापासून संबंध आहेत. संबंध असतात सर्वांचे. धोरणांवर टिका होऊ शकते. वैयक्तिक नाही. २०१९ मध्ये ज्यावेळेला लाव रे तो व्हिडिओ जी टॅगलाईन होती, ती नरेंद्र मोदी किंवा इतर कुणाच्या वैयक्तिक विरोधासाठी नव्हती, तर त्यावेळच्या धोरणांवर ती टिका होती. ती वैयक्तिक मुळीच नव्हती. ज्यावेळी लोक आघाड्या करतात, त्यामध्येही बिघाड्या होतातच की, असंही ते म्हणाले. त्यामुळे कुणाच्या भेटी घेतल्यामुळे तो राजकीय विषय आहे, असे अजिबात नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray at Chandrashekhar Bawankule's Home.
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा भाजपला ठरणार आव्हान? बावनकुळे म्हणाले...

मी निमंत्रण दिले होते...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. ही सदिच्छा भेट आहे. यामागे कुठलाही राजकीय अजेंडा नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आपण राज ठाकरे यांची भेट घेतली होती. नागपूरला याल तेव्हा घरी या, असे निमंत्रण त्यांना दिले होते. तो योग लवकरच जुळून आला असल्याचे बावनकुळे यांनी काल सांगितले. शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची प्रतिमा भेट देऊन बावनकुळे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.

विशेष म्हणजे ठाकरे यांनी रविवारी गडकरी यांच्यासोबत फुटाळा फाउंटन बघितला. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या मुंबई येथे भेटीगाठी झाल्या आहेत. राज आणि भाजप नेत्यांच्या वरच्यावर सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com