

Yavatmal news update : यवतमाळ पोलिस दलातील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ पोलिस दलाच्या ‘ऑपरेशन प्रस्थान’चे कौतुक देखील केलं.
अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाला अवघे दोन महिने उलटत नाही तोच, पोलिस ठाण्यातील निरीक्षक नरेश रणधीर याला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली. तक्रारदराकडून तब्बल तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना पथकाने नरेश रणधीर याला अटक केली आहे.
पोलिस निरीक्षक नरेश रणधीर याने अडकलेल्या पैसे काढून देण्याच्या मोबदल्यात ही लाच (Bribery) मागितली होती. थेट पोलिस निरीक्षक लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यवतमाळ पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नरेश रमेशराव रणधीर (वय 52) हा मूळचा अंमळनेर (जि. जळगाव) इथल्या रहिवासी असून यवतमाळ इथं कार्यरत आहेत.
तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत. याप्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबरला अवधूतवाडी पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अमरावती पथकाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात नरेश रणधीर याने तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून, एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधच्या अमरावती पथकाने त्याला ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावतीचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन महिन्यापूर्वी लोकार्पण झालेल्या अवधूतवाडी इमारतीमधील पोलिस निरीक्षक थेट लाचेच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलिस अन् नागरिकांमधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’ हा उपक्रम सुरू केला असून, तो चर्चेत आहे. या उपक्रमाची खुद्द राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत कौतुक केलं. यवतमाळ पोलिस दलाचे काम ‘प्रेरणादायी’ असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी तडा दिल्याची चर्चा पोलिस दलात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.