मुंबई : : काँग्रेस नेते आणि मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी (OBC) व भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून मनमानी कारभार करतायेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हसं या या प्रस्थापितांच्या सरकारनं करून ठेवलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला आहे.
''बड्या बड्या बाता आणि 'धोरण' खातंय लाथा,'' अशी वडेट्टीवरांची गत झालीये. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याच दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार यांचे धोरण असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.
''MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परीक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र, दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देते आहे. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योतीमात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याच काम करतेय,'' असा आक्षेप पडळकरांनी घेतला आहे.
''सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केलं तर तीन दिवसात निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत, महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? हे वडेट्टीवारांनी स्पष्ट करावे, प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला आहे.
काही दिवसापूर्वी विजय वडेट्टीवार यांच्यावर माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी अडीच कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. विजय वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा महाज्योती कार्यालयावर विद्यार्थ्यांना घेऊन मोर्चा काढणार, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
नागपूर येथील नागपूर फ्लाईंग क्लब या 4 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम दिलं. नागपूर फ्लाईंग क्लबला अडीच कोटी देऊन 6 महिने झाले तरी एकाही विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिले गेले नाही. बंद पडलेल्या या प्रशिक्षण कंपनीकडे स्वतःचे विमान नाही, प्रशिक्षक नाही, इतकंच काय तर कमर्शिअल पायलट ट्रेनिंग देण्याचा परवानाही नाही. असं असलं तरी कंपनीला अडीच कोटी दिले गेले, असा आरोप शेंडगे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.