अविनाश चंदने-
Bmc Politics News : मुंबई महापालिकेने काँक्रिटच्या रस्त्यांसाठी मंगळवारी नव्याने निविदा काढल्या आहेत. या निविदेची रक्कम आधीपेक्षा 308 कोटींनी कमी झाल्याने आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. आधीच्या निविदेत खर्च वाढला होता की आताच्या निविदेत खर्च कमी झाला आहे, असा सवाल करत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना लक्ष्य केले आहे.
मुंबई महापालिकेने काल दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्याने 1 हजार 362 कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. यापूर्वी हीच निविदा 1 हजार 670 कोटींची होती. पण मे. रोडवे सोल्यूशन इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंत्राटदाराने काम सुरू न केल्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे काम सुरू न करणाऱ्या या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याचीही मागणी आदित्य ठाकरेंनी ट्वीट करून यापूर्वी केली होती.
मुंबई महापालिकेने यंदा जानेवारीमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 397 किलोमीटर लांबीच्या 910 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 5 कंत्राटदारांना 5 हजार 800 कोटींचे कंत्राट दिले होते. त्यातील मे. रोडवे सोल्यूशन इन्फ्राकडे आठ वॉर्डतील 214 किलोमी़टर रस्त्यांची कामे करायची होती. प्रत्यक्षात जानेवारी ते डिसेंबर या 11 महिन्यांत केवळ 123 कामे सुरू झाली होती. तर काम न करणाऱ्या मे. रोडवे सोल्यूशन इन्फ्राचे कंत्राट रद्द करून आणि कंपनीला 52 कोटींचा दंड ठोठावत मुंबई महापालिकेने नव्याने निविदा काढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 'घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना फसवण्याचा प्रकार केला' असा आरोप आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहून केला आहे. एवढेच नाही तर यापुढे कंत्राटदारांकडून सुरक्षा अनामत रक्कम 1 टक्क्याऐवजी 10 टक्के घ्यावी तसेच आधीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणीही केली आहे.
या पार्श्वभूमीवर कुलाब्याचे माजी अॅड. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. शिवाय यामुळे महापालिकेचे झालेले नुकसान आणि लोकांची झालेली गैरसोय पाहता कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.