Ajit Pawar on Rohit Pawar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती (Birth Anniversary) बुधवारी देशभर साजरी होत आहे. यानिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज (बुधवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात जुंपली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हाही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकारण समोर आले होते. यंदाही यावरुन राजकारण रंगले आहे.
अजित पवार म्हणाले, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात. आघाडीचे सरकार असताना गेल्या वर्षी मी देखील या कार्यक्रमाला गेलो होतो.पण यंदाच्या कार्यक्रमाबाबत मला काहीही माहिती नाही. आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाबाबत मला कल्पना नाही,"
"रोहित पवार हे तेथील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी कुठला कार्यक्रम घेतला आहे, याबाबत मला माहिती नाही," असे सांगत अजित पवारांनी रोहित पवारांवर बोलणं टाळलं.
चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असताना सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसते. आमदार राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन केले. होळकर जयंती समितीचे अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे आहेत.
शासकीय कार्यक्रमात एकीकडे स्वागत अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे यांनी सकाळी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीत पूजा करुन मिरवणूक काढली.
यावरुन रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. बुधवारी सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली. चौंडी या गावातील विविध ठिकाणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भाविकांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.