Mumbai News : राज्यात सध्या राजकीय घडामोडीना वेग आला आहे. निवडणूका होईपर्यंत कोण कुठल्या पक्षात असेल याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, अशातच नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरेविषयी कायदा पारित करण्यासाठी ते या उपोषणावर बसले आहेत. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रोख धरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रमध्ये पाय ठेऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. त्यांच्यासोबत सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे. मात्र, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे.
Prakash Ambedkar Latest News
नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर म्हणजे मराठा समाजावर टीका केली, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा सध्याचा स्थर खालावला आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झाली आहे. हे गढूळ पाणी नागरिकांनी पिण्या लायकीच आता राहिलेले नाही. आता होणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी हे गढूळ पाणी बदलले पाहिजे आणि तब्येत जपली पाहिजे, असे म्हणत भाजपकडे इशारा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ट्विटच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील आता काहीही बडबड करायला लागले आहेत. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी बेताल बडबड केली आहे. त्यांनी आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलवून दाखव, त्यावेळी असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल, असे ट्विट करत त्यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याने राजकीय गणितं बदलली आहेत. मात्र, पक्षातील नेते पक्ष का सोडून जातात, त्याचसोबत त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करताना ते रिंगमास्टर आहेत. येथील नेत्यांना मी आधीच वॉर्न केले होते. मोदी यांना ज्यांना नाचवायचं आहे, त्यांना नाचवणार आणि जे नाचण्यास नकार देतील त्यांचे घोटाळे बाहेर काढत भाजपमध्ये घेऊन यायचे. त्यामुळेच हे असेच सुरु राहणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने त्यांचा पक्ष आणि पक्षातील नेत्यांना सांभाळावे. इतर पक्षांना देखील त्यांनी हा सल्ला दिला आहे. कारण भाजप आता सगळ्यांना आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, आणि ते करण्यासाठी कोणत्याही थराला जातील असे देखील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत. इतर पक्षांना त्यांनी भाजपसोबत जपून राहण्याचा जणू इशाराच दिला आहे.