

Sangram Thopate
Sarkarnama
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला नवा अध्यक्ष मिळण्याची तयारी सुरू झाली असून येत्या 28 डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. त्यासाठीचा ठराव मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.
हे पद काॅंग्रेस पक्षाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यात संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांचे नाव आघाडीवर आहे. या निवडणुकीसाठी येत्या 27 डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. अध्यक्षपद निवडीसाठी या आधी गुप्त मतदानाची पद्धत बदलून आवाजी मतदानाने करण्यात आली आहे. त्यामुळे येथे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार फारसा संघर्ष न करता निवडून येण्याचे निश्चित मानले जात आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे निलंबित केलेल्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती देण्यात आली.
थोपटे यांच्या नावाला काॅंग्रेस श्रेष्ठींसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे थोपटे कुटुंबात तब्बल तीस वर्षांनंतर लाल दिव्याची गाडी येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या पदाच्या खुर्चीत बसण्यासाठी थोपटे यांची तयारी झाली आहे. या आधी त्यांनी तालिका सभापती म्हणून काम पाहिले आहे.
भोर-वेल्हा मुळशी मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनदा संग्राम थोपटे आमदार राहिले आहेत. आघाडी सरकारमध्ये म्हणजे, २००९ ते २०१४ आणि आताच्या ठाकरे सरकारमध्ये थोपटे यांना मंत्रीपदाची आशा होती. मात्र, गटातटाच्या राजकारणात या दोन्ही सरकारमध्ये त्यांचा पत्ता कट झाला; ठाकरे सरकारमध्ये; तर पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून थोपटे यांच्या वाट्याला निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपद येण्याचा अंदाज होता. मंत्रीपदासाठी थोपटे शपथ घेण्याचीही तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी नाव वगळल्याने प्रचंड नाराज झालेल्या थोपटे समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनावर हल्ला चढविला आणि पक्षालाच आव्हान दिले. त्यातून थोपटेंनी हायकमांडची नाराजीही ओढवून घेतल्याचे बोलले गेले.
त्यानंतर काहीसे शांत राहिलेल्या थोपटेंना मंत्रीमंडळ विस्तारात लॉटरी लागण्याची आशा होती. परंतु, तसे काही घडले नाही. शेवटी विधानसभा अध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार झाल्याने यापदासाठी थोपटेंचे नाव आघाडीवर आले. मात्र, गेल्या दहा महिन्यांत ही निवडणूक न झाल्याने थोपटेंना अधांतरीच राहावे लागले होते. मागील अधिवेशनात थोपटेंची निवड होण्याची शक्यता असतानाच कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे यापदासाठी थोपटेंना 'वेटिंग'वर राहावे लागले. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक ठरली असून, त्यासाठी थोपटेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. एवढ्या महत्त्वाच्या पद मिळणार असल्याने थोपटे कुटुंब आणि समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे.
काँग्रेसवरील निष्ठेपायी थोपटेंना मंत्रिमंडळातील स्थानाची अपेक्षा होती. तेही वजनदार खाते अपेक्षित होते. परंतु, हे मंत्रीपद हुलकावणी देत असल्याने विधानसभा अध्यक्षपद घेऊन थोपटेंना समाधान मानावे लागत आहे. त्याआधी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना या पदावर बसवून, त्यांच्याकडील ऊर्जा खाते आपल्याकडे घेण्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रयत्न असल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.