सातारा : भुईंज येथील ग्रामपंचायतीच्या (Bhuinj Grampanchayat) मालकीची जागा सरपंच (Sarpanch), उपसरपंच (UpSarpanch) आणि सदस्यांनी परस्पर संगनमत करून अनधिकृरीत्या विकून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भुईंज पोलिस (Police Station) ठाण्यात तत्कालीन सरपंच बाळासाहेब कोंडीबा कांबळे व उपसरपंच अनुराधा गजानन भोसले आणि ग्रामसेवक विष्णु महेश्वर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकारामुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून तत्कालिन ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. Bhuinj Panchayat land sold; Crime against 12 persons including Sarpanch
२०१२ ते २०१७ या कालावधीत भुईंज (ता. वाई) ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कोंडीबा कांबळे (मयत), उपसरपंच अनुराधा गजानन भोसले व सदस्य चंद्रदिप संभाजी भोसले, मदन अर्जुन शिंदे, प्रशांत रामचंद्र जाधव, शेखर श्रीरंग मोरे, सिमा प्रदिप कांबळे, रेखा जयवंत लोखंडे, माया राजेंद्र भोसले, कविता चंद्रकांत निकम, इंदू उत्तम खरे, धनश्री राजेंद्र शेवते, प्रकाश लक्ष्मण धुरगडे, प्रकाश बजरंग ननावरे, अर्चना रविंद्र भोसले, नुतन भरत भोसले, नारायण शंकर शेडगे सर्व जण राहणार भुईंज (ता. वाई) यातील एक ते बारा आणि ग्रामसेवक विष्णु महेश्वर चव्हाण (रा. अंबवडे (सं) ता. कोरेगाव) या कार्यकारणीने व ग्रामसेवकानी आपापसात संगनमत केले.
भुईंज ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काची गट क्रमांक ८१४ एकुण क्षेत्र ९.५७ हेक्टर आर व गट क्रमांक ७८२/२ एकुण क्षेत्र ४.५ हेक्टर आर या दोन्ही क्षेत्रातील सुमारे ३०.५० आर (गुंठे) क्षेत्र मोकळी जागा विकली. ग्रामपंचायतीचा बोगस ठराव करून परस्पररीत्या १८ लोकांच्या नावे ग्रामपंचायत नमुना नंबर आठच्या भोगवटा सदरी लावून मिळकत उतारे तयार केले. एकूण मिळकतींची सरकारी दराप्रमाणे होणारी किंमत जास्त होत असताना देखील त्यापेक्षा कमी किंमत घेऊन ग्रामपंचायतीचे नुकसान केले.
तसेच दुय्यम निबंधक वाई यांनी या मालमत्तेचे मुल्यांकन ३६ लाख ६६ हजार ६०० एवढे केले आहे. यापेक्षाही जास्त बाजारभावाची रक्कम तत्कालिन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी अपरोक्षपणे एकमेकांच्या विचार विनिमयाने व संगनमताने स्वीकारली. ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीच्या व नियमाप्रमाणे असणा-या बँक खात्यामध्ये रक्कम भरणा न करता बेकायदेशीर व नियमबाह्यरीत्या ग्रामपंचायतीच्या नावे स्वतंत्र बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा भुईंज येथे खाते काढून मिळकती हस्तांतरणा पोटी स्वीकारलेली अनामत रक्कम २२ लाख १५ हजार रूपये जमा केली आहे.
त्या पैशाचाही गैरवापर केला अशी तक्रार पंचायत समिती वाईचे विस्तार
अधिकारी रुपेश सुरेश मोरे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सुजाता निलेश भोसले व अन्य पाच ग्रामपंचायत सदस्यांनी
२९ डिसेंबर २०१७ रोजी वाईच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यांनी याबाबत तपास करून त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांना अहवाल सादर केला होता. त्यावेळी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते. तर ग्रामविस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी विष्णू महेश्वर चव्हाण यांना निलंबित केले होते.
यावर सरपंच बाळासाहेब कांबळे व त्यांनी सदरची चौकशी राजकीय आकसापोटी व खोटी असल्याची तक्रार कैलास शिंदे आणि यांच्याकडे गेले होते. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी य कैलास शिंदे यांनी या प्रकरणाची पुनरचौकशी करण्याचे आदेश कराडच्या गटविकास अधिकाऱ्यांना केले होते. त्यांच्या चौकशीतही वरील सर्वजण दोषी आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाईच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. चार महिन्यापूर्वी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली होती. मात्र योग्य त्या पोलिस चौकशानंतर नुकताच हा गुन्हा भुईंज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला .चौकशी दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.