Mumbai News : लोकसभा निवडणुकीत ४८ जागांचे टार्गेट ठेवलेल्या भाजपने आता पक्ष बांधणीला सुरूवात केली असून आज मुंबईत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवली आहे. मिशन ४५ साठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हाध्यक्षांची बैठक होईल, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील जिल्हाध्यक्षांना निवडणुकीसाठी कानमंत्र देणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधकांमध्ये भविष्यातील लढाई चांगलीच रंगणार असल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपने राज्यभरातील लोकसभेच्या १८ मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. बुलढाणा, चंद्रपूर, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली, औरंगाबाद, शिरूर, शिर्डी, सातारा, पालघर, कल्याण, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघ भाजपचे विशेष टार्गेट आहे, तर बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघातही भाजप आपली ताकद पणाला लावली आहे.
मिशन ४५ चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आजच्या बैठकीत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष विस्तारासह महायुतीचे सूत्र समजून सांगणार आहेत. इतकेच नव्हे तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करण्याच्या सूचना देणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केल्याचं दिसत आहे. भाजपचे नेते १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत.
महाराष्ट्राचा मिशन ४५ साठी काही केंद्रीय मंत्रीही महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले असून त्यातील दहा मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. मिशन ४५ साठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने १२ प्रमुख नेत्यांची या निवड केली असून प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. यात भाजप नेते रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, विनोद तावडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 मध्ये 48 पैकी २३ जागांवर भाजप, तर १८ जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला, तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवारही विजयी झाले. मात्र आगामी निवडणुकीत मात्र भाजपने थेट ४५ जागांवरच दावा केल्याने येणाऱ्या निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.