कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज तब्बल 24 दिवसांनंतर महेश गायकवाड ठणठणीत बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे गायकवाड पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यामुळे कल्याण पूर्वेकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी उल्हासनगरमधील हिललाइन पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे (शिंदे) कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे दोघे जखमी झाले होते.
दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुरुवातीला महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. गायकवाड यांना सहा, तर राहुल पाटील (Rahul Patil) यांना दोन गोळ्या लागल्या होत्या.
राहुल पाटील यांना 16 दिवसांनी घरी सोडण्यात आले, तर गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार म्हणून कल्याण शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. पण डिस्चार्ज मिळाला नाही. आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुल पाटील आणि कार्यकर्ते तसेच त्यांच्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश गायकवाड लाडकी लेक अद्विकाला हातात घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी सारिका आणि मुलगा शिवम आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित होती. ते आलिशान कारमधून घराकडे रवाना झाले. या वेळी त्यांच्या गाडीच्या मागेपुढे मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांच्या गाड्या होत्या.
महेश गायकवाड जखमी झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) रात्रभर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये थांबून होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच ते घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई, शहाजी बापू पाटील आदी नेत्यांनी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.