फक्त दिखावा न करता नागरिकांना भावेल, त्यांना अनुभवता येईल अशा प्रकारचा पनवेल आणि परिसराचा विकास व्हायला हवा. 'साफ नियत, सही विकास' हेच आमचे धोरण आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. "सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान आमदारप्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री विषद केली.
पनवेल ते सीएसटी एलिव्हेटेड कॉरिडोर होणार आहे. पनवेल-कर्जत रेल्वे सुरू होत आहे. पनवेल हे नवे उपनगर होऊ पाहत आहे. 1970 ला सिडकोची स्थापना झाली. गावांच्या विलीनीकरणातून नवी मुंबई तयार झाली. एअरपोर्टसाठी नैनाची स्थापना झाली. पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, खालापूर येथे नैना प्रकल्प राबवला जात आहे. नैना प्राधिकरणाच्या विकासातून कायापालट केला जाणार आहे. पनवेलची लोकसंख्या 12 लाखांपर्यंत गेली आहे. विकास हेच मोठे आव्हान आहे. पायाभूत सुविधा भक्कम असणे हेच मुख्य काम आहे.
त्या-त्या प्राधिकरणांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा अधिक विकास झाला पाहिजे. पाण्याचे स्रोत वेळच्या वेळी विकसित झाले पाहिजे. पाणीपुरवठ्यासाठी तयार केलेल्या बाळगंगा व कोंढाणे या धरणांचे भ्रष्टाचारामुळे काम रखडल्याने दुसऱ्या धरणांचे पाणी वापरले जात आहे. हेटवणे धरण सिंचनासाठी तयार केलेले होते; मात्र आता पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जात आहे. एमजेपीतर्फे सिडको व पालिका गावांना पाणी देते.
मोरबे धरणातून कामोठे, खारघर येथे पाणी दिले जाते. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, 675 प्रतिलिटर कुटुंब पाणी देण्याचे सिडकोचे नियोजन आहे. पण त्यापेक्षा जास्त पाणी कुटुंबाला मिळायला हवे. त्यासाठी नियोजन केले पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचे स्वच्छ पाणी बांधकाम, वृक्षारोपणाकरिता वापरले पाहिजे.
शहरी भागातदेखील विकासाची दिलेली आश्वासने सिडकोकडून पूर्ण व्हायला हवीत. उद्याने, बगिचे, रस्ते, मैदाने, ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र, धावपट्टी, समाज कार्यालय, फेरीवाल्यांसाठी मार्केट इमारत, शहरातील अनेक रस्ते फेरीवालामुक्त करून त्यांना दुसऱ्या जागांवर बसवले आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मिळायला हव्यात. सरकारी रुग्णालय, न्यायालय इमारत अशा सर्व सुविधांनी युक्त असे हे शहर झाले पाहिजे, असा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारे प्रकल्प महापालिकेतर्फे उभारले जाण्याचा प्रयत्न आहे.
रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना स्वतःसाठी काम करायचे नाही, असे आम्ही निश्चित केले होते; परंतु आमच्यावर टीका करणाऱ्यांना काळाने उत्तर दिले आहे. सुरवातीला भाजपचे काम मला माहीत नव्हते; पण जेव्हा आम्ही नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, पक्ष संघटन, सरकारच्या मंडळींनी केलेल्या कामांची अंमलबजावणी यात फार अंतर दिसत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सुट्टी न घेता काम करणे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करणे हे सर्व त्यांच्या दैनंदिन कामातून दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या जे-जे निदर्शनास आले ते त्यांनी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केला.
कॉंग्रेसचे जे मुख्यमंत्री होऊन गेले त्यात विलासराव देशमुख अपवाद होते; पण इतर आमची सत्ता अशीच राहील, अशा आविर्भावात राहिले; मात्र भाजपमध्ये तसे नाही. निवडून आलेल्या आमदारांपैकी काही हाताच्या बोटावर मोजता येतील, असे मंत्री केले आहेत.
तसेच त्यांच्या डोक्यात हवा जाईल, असे कोणी वागत नाहीत. पक्षाच्या बैठकीतही पक्षातील पदाधिकाऱ्यांचे स्थान महत्त्वाचे असते. मंत्री त्या वेळी प्रेक्षक व इतर कार्यकर्त्यांमध्ये बसतात. भाजपात बाहेरून येणाऱ्यांना सर्वांना ते जाणवते.
जातीवादाच्या बाहेरचे समाजकारण
शेतकरी कामगार पक्षात लहानाचा मोठा झालो. माझे आजोबा जनार्दन भगत यांनी आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचे काम केले. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाबा रामशेठ ठाकूर यांची आक्रमकता सातत्याने पाहिली आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी भांडणे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणे हे तुमचे ध्येय्य असले पाहिजे.
कॉंग्रेसममध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जे आहे ते स्वीकारणे, कशावर प्रतिक्रिया देऊ नये, असे काम केले जात होते. टोलसाठी आम्ही आंदोलन केले. एसईझेडला विरोध केला. लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लोकांसोबत राहिलो आहोत. पक्षानेही एका अंशापर्यंत टोकाचा विरोध केला नव्हता; मात्र टोलच्या मुद्द्यावर आंदोलन करू नको, असे सांगण्यात आले होते.
भाजपने कधीच सत्तेविरोधात आंदोलन करू नका, असे सांगितले नाही. भाजपच्या नेत्यांशी माझे खूप जवळचे संबंध नव्हते. त्यामुळे जे लोक सांगतात त्यावर आपण विश्वास ठेवत होतो.
संघाच्या विचार धारेवर चालणाऱ्यांना भाजप चालतो. तुष्टीकरणाची राजनीती, वंशवाद आणि जातीवाद याच्या बाहेर जाऊन समाजकारण केले पाहिजे, अशी शिकवण आम्हाला संघाने दिली. भाजपच्या सत्तेत केव्हाच दंगली झाल्या नाहीत. कॉंग्रेसच्या काळात गुजरात आणि इतर राज्यांत अनेक ठिकाणी जातीय दंगली झाल्या. उलट भाजप सरकार आल्यापासून आता दंगली बंद झाल्या आहेत.
सिडकोच्या कामात सुसूत्रता
मला मिळेल ती जबाबदारी आनंदाने पार पाडेन. सिडकोच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी मी पार पाडत आहे. पूर्वी फक्त पाहण्याइतके काम होते; परंतु आता एक भागीदार म्हणून काम करीत आहे. सिडकोच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये सुसूत्रता आणून चांगल्या सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.
सिडको हे एक महामंडळ आहे; पण त्याला राज्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही; मात्र भाजप सरकारने मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवे, जिल्ह्यातील परेड बंद केल्या. भाजपममध्ये मंत्र्यांना फारशी किंमत नाही; मात्र एक आमदार म्हणून जास्त अधिकार माझ्याकडे आहेत. त्याचा फायदा जास्तीत जास्त जनतेला होण्यासाठी काम करेन. माझ्यावर असलेल्या जबाबदारीने मी समाधानी आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी स्वीकारेन.
नागरिकांचे जीवनमान उंचावणार
पनवेलसाठी रस्ते, गटारे, पाणी अशा चांगल्या सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अशा सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. खारघरमध्ये तयार होत असणारे कलाकेंद्र, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी कम्युनिटी सेंटर, छोटी क्रीडा संकुले, पनवेलमध्ये झालेल्या शंभर खाटांच्या रुग्णांसारखी महापालिकेच्या माध्यमातून इतर लहान रुग्णालये तयार करणे, चांगली मैदाने, क्रीडा संकुले, प्रत्येक वयोगटातील लोकांना हे शहर आपलेसे वाटावे, याकरिता प्रकल्प राबवायचे आहेत.
पाणीसमस्येवर तोडगा निघालाय
सिडकोचे अध्यक्षपद माझ्याकडे आल्यावर असे लक्षात आले की पाण्याचे स्रोत कमी आहेत. तसेच जे नियोजन झाले आहे, ते पाण्याच्या यशस्वितेनुसार केले आहे. सिडको हेटवणेतून पाणी आणते; पण पाण्याची मागणी वाढल्यावर सध्या सिडको नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेते. त्याचे नियोजन सिडकोने आधी केले नव्हते.
पाताळगंगा धरणातून एमजेपीद्वारे आणले जाणारे पाणी ज्या जलवाहिनीतून आणले जाते, ती अतिशय जीर्ण झाली आहे. तब्बल 2 कोटी लिटर पाणी रोज वाया जात आहे. त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 2009 पासून पाठपुरावा करीत आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेने तयारी दाखवली होती; मात्र त्या वेळी जेएनपीटीने खर्चाच्या बाबीवरून नकार दिला. त्यानंतर सिडको व पालिकेने नकार दिला.
तसेच कोणत्या कर्जाची गरज नाही, असे सरकारी प्राधिकरणाने सरकारला कळविल्यामुळे अमृत योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्यात दिरंगाई झाली. हेटवणेतून ज्या जलवाहिनीतून खारघरला पाणी येते, त्या जलवाहिनीवरील दहा किलोमीटरची जलवाहिनी सिमेंटची आहे. जितेजवळ पाणी शुद्धीकरण केले जाते.
सिडको अध्यक्ष झाल्यापासून बैठका व पाठपुरावा घेत जलवाहिनी तयार करण्याचे काम आहे. पण ज्या सोसायटीला चांगल्या दाबाने पाणी मिळत नसेल, त्या संबंधित सोसायटीला सिडकोने अपेक्षित दाबानुसार पाणीपुरवठा करायचा, असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सिडकोच्या जबाबदारीने ते काम केले आहे.
तसेच ओव्याचे धरण, तळोजा एमआयडीसीला देण्यात येणारेपाणीप्रक्रिया केलेले सांडपाणी देणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या योजनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगकरिता सक्ती करायला हवी. इमारतीच्या छतावर बसवण्यात आलेले बेकायदा पत्रे न हटवता त्या पत्र्यांच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला भाग पाडावे, असा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी केली आहे. या माध्यमातून उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होईल. आम्ही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रयत्न प्रामाणिक आहे. तसेच पाण्याची गळती रोखण्यासाठी स्काडा सिस्टिमचा वापर केला जाणार आहे.
वायुप्रदूषणाबाबत सरकारकडे पाठपुरावा
वायुप्रदूषण ही गंभीर समस्या. शहरात होणारे वायुप्रदूषण मोजण्यासाठी विविध ठिकाणी प्रदूषण मोजणारे यंत्र बसवले जावे, अशी मागणी एमएमआरडीएकडे केली होती. एमपीसीबी पाणीप्रदूषणाबाबत कारवाई करते; परंतु वायुप्रदूषणावर फारशी कारवाई होत नाही.
तळोजातील प्रदूषणकारी काही कारखान्यांवर हरित लवादाने कारवाई केली; परंतु त्या कंपन्यांनी कामगारांच्या नोकऱ्यांचा मुद्दा पुढे करून सहानुभूती मिळवली आहे. मात्र हवेचा घसरलेला दर्जा तपासण्याचे साधन असले, तरी येणारा वास मोजता न येणारा आहे. त्याचा काही कंपन्या गैरफायदा घेतात. त्याकरिता ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
कर्नाळा बॅंकेबाबत ग्राहक नाराज
कर्नाळा बॅंकेच्या परिस्थितीमुळे अनेक ग्राहक वैतागलेले आहे. शिक्षणासाठी, लग्नासाठी गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक कंटाळलेले आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बॅंक असल्यामुळे अनेकांना चांगले गुंतवलेल्या ठेवी लोकांना परत कधी मिळणार, असा प्रश्न लोकांना पडला आहे. तेव्हा लोक आमच्याकडे आले.
आम्ही यात लक्ष घातल्यास पुन्हा राजकीय वळण दिले जाईल, म्हणून त्यात पडू नये, असे काहींनी सांगितले; मात्र त्याच्या उलट असे झाले, की ज्या लोकांना दमदाटी केली गेली ते शेकापचेच लोक निघाले. तेव्हा लोकांसमोर परिस्थिती आली. जमिनीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम त्यांनी बॅंकेत ठेवली. गेला महिनाभर बॅंकेचे चेअरमन लोकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
याबाबत आम्ही जर गप्प राहिलो, तर आपण लोकांना प्रतिसाद देत नाही, असा अर्थ होईल. त्याकरिता पाऊल पुढे टाकल्यावर लोकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या. जर तक्रार केली, तर पैसे मिळणार नाही, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेत तक्रार करणाऱ्या ग्राहकाला एका पत्रकाराने सांगितले की, तू आता तक्रार केलीस. आता पैसे मिळणार नाही.
'बरं ते खरं'
स्वतःचे पैसे उद्विग्नतेने मागण्याला दादागिरी कसे बोलले जाते. त्याकरिता आम्ही किरीट सोमय्या यांना यात लक्ष घालण्यास सांगितले. तसेच येणाऱ्या काळात आरबीआय आणि सहकार खात्यातून बॅंकेची तपासणी होईल व ठेवीदारांच्या हिताचे पाऊल सरकार उचलेल. निवडणुका संपल्यानंतर बॅंकेचा निकाल लागेल, हे पटवून दिले; मात्र लोकांच्या सोशिकपणाचे कौतूक वाटते. लोकांमध्ये बरं ते खरं अशी प्रवृत्ती आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मला यश आले आहे.
विरोधकांचा विकासाला विरोध
ज्या पक्षात मी काम करतो, त्या पक्षाची जमिनीवर राहून लोकांची कामे करणे अशी शिकवण आहे. प्रजा हीच राजा, असे आमचे मुख्यमंत्री सांगतात. त्यानुसार काम केले जाईल.
माझ्या विरोधातील उमेदवाराच्या पक्षाने लोकांचा भ्रमनिरास केला आहे.
कळंबोली, कामोठे, खारघर या ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात होत्या; परंतु महापालिकेला खारघर ग्रामपंचायतीनेच विरोध केला होता. ग्रामपंचायतींने जाणीवपूर्वक विरोध केला होता. विकासाला विरोध आहे. विकास व्हावा तो माझ्या ओंजळीतून व्हावा. ते नेते आता बाजूला झाल्यामुळे तो पक्ष व नेते लोकांच्या मनातून उतरत आहेत. या परिस्थितीत अशा लोकांच्या आधारावर साडेपाच लाखांची मतदार संख्या असलेली निवडणूक लढवली जाऊ शकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.