मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गुरूवारी भाजपसह एमआयएम व महाविकास आघाडीतील (MahaVikas Aghadi) शिवसेनेलाही धक्का दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीनही पक्षांचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले आहेत. तसेच कल्याण ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यामुळे एकाचवेळी राष्ट्रवादीने सर्वच पक्षांना हादरा दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीचे एमआयएम (AIMIM) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज गुलजार मौलवी, नगरसेवक तन्झिला अयाज मौलवी, आर. झेड. हास्मी, अर्शद शब्बीर शेख, मोहम्मद मेहबूब शेख, अकदूस सोहेल सुसे, हरमीत सिंग गुप्ता यांच्यासह 105 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसेच महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकर पाटील, शिवसेनेच्या (Shiv Sena) नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या (BJP) नगरसेविका सुनिता खंडागळे व माजी नगरसेवक फैसल जलास यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
कल्याण ग्रामीण मधील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि मनसे (MNS), युवासेना, आरपीआय, समाजवादी पार्टी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पक्षप्रवेश झाला. हे पक्षप्रवेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, कल्याण शहराध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील उपस्थित होते.
शिवसेनेसोबत युतीचा विचार
कल्याण-डोंबिवलीतील आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि सुधीर वंडारशेठ पाटील शहरात पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असं आवाहनही आव्हाड यांनी यावेळी केले.
वाढत्या महागाईचा भार सामान्य माणसाच्या खिशावर पडतो याची जाणीव केंद्र सरकारला नाही. याउलट देशाला संविधान बहाल करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न जुमानण्याची भूमिका आज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली दिसत आहे. ही भूमिका म्हणजे देशासाठी पहिली धोक्याची घंटा असल्याचे जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.