
Mumbai, 25 Apr 2025: पसायदान ही केवळ प्रार्थना नसून, मानवाच्या सर्वांगीण उत्थानासाठीचे तत्त्वज्ञान आहे. पसायदानाचे मनन केल्याने मनातील संकुचितता नष्ट होते आणि विश्वबंधुत्वाची भावना जागृत होते, असे प्रतिपादन ह.भ.प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.
जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. विष्णुपंत देहाडराय यांच्या स्मरणार्थ सद्गुरू सेवा समिती, पंढरपूर-मुंबई आणि युवा सेतू फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित तीनदिवसीय प्रवचनमालेचा समारोप दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. या प्रवचनमालेत चैतन्य महाराजांनी पसायदानाचा गहन अर्थ उलगडत ते सर्व धर्म आणि संस्कृतींना जोडणारे आहे असे म्हटले.
पसायदान म्हणजे नि:स्वार्थ भावनेने विश्वाच्या कल्याणासाठी केलेली याचना आहे, जी माणसाला अहंकार सोडून सर्वसमावेशक विचार करण्यास प्रेरित करते. प्रत्येक ओवी विश्वातील दुःख नष्ट होऊन सुख आणि समृद्धी यावी, अशी ईश्वराकडे मागणी करते. पसायदान वाचणे म्हणजे आपल्या अंतःकरणात संतांचे विचार रुजवणे होय.
यातून माणसाला जीवनातील खरे ध्येय समजते, असे त्यांनी अधोरेखित केले. पसायदानातील ‘चंदनाचे वृक्ष लागो’ या ओवीतील प्रेम आणि शांतीचा संदेश विश्वभर पसरवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरुणांना पसायदानाच्या पठण आणि चिंतनाद्वारे जीवनात सकारात्मकता आणण्याचा संदेश देत त्यांनी पसायदान हा जीवनाला दिशा देणारा मार्ग असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे आणि सीए प्रतीक कर्पे, श्री सिद्धिविनायक न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, प्रसिद्ध पत्रकार नवनाथ बन उपस्थित होते. मराठे यांनी ‘ओम सर्टिफिकेट’ उपक्रमाची माहिती देत तरुणांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शिक्षणाशी जोडण्याचे त्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. माधवदास राठी यांनी सूत्रसंचालन केले. कै. विष्णुपंत देहाडराय यांनी आणीबाणीत मिसाबंदी म्हणून तुरुंगवास भोगताना ज्ञानेश्वरीचे पारायण करून सहकाऱ्यांमध्ये आध्यात्मिक प्रेरणा जागवली.
प्रवचनमालेच्या समारोपाप्रसंगी ह.भ.प. भानुदास महाराज देगलूरकर यांच्या ‘श्री ज्ञानेश्वरी - उपासना’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन झाले. या पुस्तकात ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक पैलूंवर सखोल विवेचन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.