Lata Mangeshkar : तो स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही : मुख्यमंत्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : प्रसिद्ध गायिका, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. त्याच्या निधनाने सगळीकडून शोक व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यावर आज दुपारी दादरच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.

''लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील,'' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती,''

''काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील,”असे मुख्यमंत्री म्हणाले.

''लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे,'' अशा शब्दात विरोधी पक्षनेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ''त्यांच्या गाण्याने संपूर्ण देशाला मोहून टाकले होते. एखादा कलाकार देशात एकदाच जन्माला येतो. माणूस म्हणूनही लतादीदी महान होत्या. जेव्हा मी तेव्हा भेटलो तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले. एक दैवी आवाज आज लोपला आहे. पण त्यांचे सूर कायम राहतील,'' अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com