मुंबई : मुंबईच्या गुंडगिरीच्या इतिहासात नाव कमावलेल्या दगडी चाळीची (Dagadi Chawl) इमारत आता नामशेष होण्याची शक्यता असून येथे आता अलिशान टाॅवर उभारण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेले 120 वर्षे भायखळा परिसरात उभी असलेली ही चाळ 1990 पासून प्रसिद्धीस आली. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील पंधारे कुटुंब या चाळीचे सुरवातीचे मालक होते. त्यानंतर ही चाळ गवळीच्या कुख्यात गुंड अरूण गवळीच्या नावाने ओळखू जाऊ लागली. `परिंदा भी पर मार नही सकता`, असे या चाळीचे वर्णन केले जात होते. त्यातून गवळीला अटक करणे किंवा कारवाई करणे हे पोलिसांना अवघड जात होते. पोलिस आले की चाळीतील महिला, मुले गोंधळ करत गवळीला वाचवत असत, असे अनेक पोलिसांनी लिहून ठेवले आहे. (Gangster Arun Gawli`s dagadi chawl to be redeveloped)
तर अशी ही दगडी चाळ आता म्हाडा विकसित करणार आहे. म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. 40 मजली दोन टाॅवर येथे बांधण्यात येणार आहे. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरे आणि उर्वरित घरे विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु आहेत.
या दगडी चाळीत दुसऱ्या मजल्यावर अरुण गवळीची `भजनाची खोली` होती. या खोलीतच मुंबईतील अनेक बिल्डर, राजकारणी, इतर व्यावसायिक यांना बोलवले जात होते. त्यांची हाडे अनेकदा तेथे मऊ केली जात आणि त्यानंतर त्यांच्याकडून वसुली होत असे. त्यामुळे दगडी चाळीतील भजनाची खोली चांगलीच नावाजलेली होती. तेथे अरुण ऊर्फ डॅडीचे अनेक जवळचे हस्तक हे व्यावसायिकांशी वाटाघाटी करत. वाटघाटी मान्य नाही झाल्या तर तेथेच त्यांना हिसका दिला जात असे. त्यातूनही कोणी ऐकले नाही तर त्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी प्रसंगी काही दिवसांनी त्यांच्यावर फायरिंगही केले जात होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी लिहून ठेवले आहे. त्यातूनच गवळी गॅंगचा दबदबा वाढला होता. मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या आत्मचरित्रात गवळीच्या अटकेबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यामुळे या `भजनाच्या खोली`चाही अनेकांना धसका होता.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी गवळीला अटक करण्यासाठी पोलिसांना जंगजंग पछाडावे लागले होते. या चाळीत पोलिसांनी काही दिवस दूधवाला, पेपरवाला म्हणून काम केले. अशी कामे करून गवळीवर नजर ठेवली. त्यानंतर 21 एप्रिल 2008 रोजी गवळीला अटक झाली. याच गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. गवळीवर सिद्ध झालेला हा एकमेव गुन्हा होता. इतर सर्व गुन्ह्यांत तो निर्दोष सुटला. त्याला नागपूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल महिन्यात त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.