
मुंबई : विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ (wet drought) जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी व पूरामुळे झालेलं शेतजमिन आणि पिकांचं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचं अधिवेशन तातडीने बोलवण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांनाही पत्र लिहिले असून राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्य शासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, "जून महिन्याच्या जवळपास 20 तारखेपासून ते आज (ता.25 जुलै) पर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचेशी मी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाऊसाने जमिनी वाहुन गेल्या असून घराचीही मोठया प्रमाणावर पडझड झाली असून स्थावर मालमत्तेचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पाऊसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने व आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये व राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे.”,असे पवार म्हणाले.
पवार पत्रात पुढे म्हणाले की, "सततच्या पाऊसामुळे शेतपिके वाहुन गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेली बियाणे, खते यांचे नुकसान झालेले आहे. आजपर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहुन गेले आहेत. अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागात वीजवितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरित ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिस्थितीमुळे दुर्देवाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आपणांस कल्पना आहे की, जोपर्यंत तेथील लोकप्रतिनिधी स्वत: पुढाकार घेऊन ही कामे यंत्रणेसोबत हातात हात घालून करत नाहीत तोपर्यंत नुकसानीचा अंदाज येत नाही. मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे पालकमंत्री जी जबाबदारी संभाळत असतात तेथे सुध्दा आज पालकमंत्री नसल्याने या यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही, असे पवारांनी सुनावले.
ते म्हणाले, अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या शासनाने 18 जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे निश्चित केले होते. पंरतू राज्यातील राजकीय घडामोडीमुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे गेले आहे. विविध माध्यमामध्ये वेगवेगळया तारखा जाहीर केल्या जात असून अधिवेशन कधी होईल याची निश्चितता नाही. माझी आपणास विधीमंडळातील सर्व पक्षांच्या विधानसभा सदस्यांच्या वतीने विनंती करतो की, 1 ऑगस्ट 2022 रोजी किंवा आपण या आठवडयातील शासनास सोयीच्या तारखेला अधिवेशन बोलवावे व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून व नुकसानीसंदर्भांत शासनाच्या धोरणाची योग्य ती दिशा समजून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह या मुद्यावर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन बोलवण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असेही पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.