Maharashtra Political News : लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या असून, महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मावळ व संभाजीनगर या ठिकाणी भाजपकडून अत्यंत घृणास्पद काम सुरू असल्याची टीका शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केली आहे. तसेच भाजप केसाने गळा कापत असल्याचा खळबळजनक आरोपही कदमांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रामदासभाईंना गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे म्हणत त्यांचे आरोपही हलक्यात घेतले. (Devendra Fadnavis News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह यांचे काम तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही महाराष्ट्रात भाजपसोबत आलो आहोत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करीत केसाने गळा कापू नये, अन्यथा माझेही नाव रामदास कदम (Ramdas Kadam) आहे, लक्षात ठेवा मीही 25 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो आहे, असा सज्जड दमच कदमांनी महाराष्ट्र भाजपला दिला. यावर फडणवीसांनी मात्र त्यांना टोकाचे बोलण्याची सवयच आहे. त्यामुळे त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचा टोला लगावला.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, रामदासभाईंना मी चांगले ओळखतो. त्यांना असे विधान करण्याची सवय आहे. कधी कधी ते टोकाचेही बोलतात. मात्र, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भाजपने शिवसेनेचा सन्मानच केलेला आहे. आम्ही 115 आहोत तरीदेखील आमच्यासोबत आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केले. आम्ही शिंदेंच्या (Eknath Shinde) पाठीमागे पूर्णपणे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचे समर्थन त्यांना आहे. महायुतीतील सर्व पक्षांना सन्मान देऊनच निवडणुकांना सामोरे चाललो आहोत. पुढेही त्यांचा सन्मानच ठेवणार आहोत. मात्र, अनेक लोक वारंवार आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी टोकाची भूमिका घेतात. आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्यांना गंभीरतेने घेऊ नये. कुणी काहीही मागायला हरकत नाही, पण वास्तविकतेवर जागावाटपाचा निर्णय होईल, असेही फडणवीसांनी ठासून सांगितले.
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना दम दिला आहे. यावर फडणवीसांनी पवारांनाही टोले लगावले. फडणवीस म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) राजकारणात 55 वर्षांहून अधिक काळ आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. त्यांना मी काही सल्ला देऊ शकत नाही. मात्र, त्यांनी विधानाचा पुनर्विचार करावा. ते खूप मोठ्या उंचीवर आहेत, याचा त्यांनी विचार करावा. ते अशा प्रकारे कुठल्या आमदाराला धमक्या देऊ लागले, तर त्यांचा स्तर खाली येईल. आणि मला वाटत नाही की कुठला आमदार त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल. त्यांचे म्हणणे मला योग्य वाटले नाही.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.