अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेऊ! असं फडणवीस पवारांना का म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता.
Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad PawarSarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागील आठवड्यात विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. त्यानंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांनी फडणवीसांच्या एका सहकाऱ्याबाबत आपल्याकडे गंभीर तक्रार आली होती, असा गौप्यस्फोटही केला. फडणवीसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी अशा गोष्टी होणार नाहीत...काळजी घेऊ, असं सांगितल्याचे पवारांनी स्पष्ट केलं होतं. त्यावेळी माध्यमे व राजकीय वर्तुळाचंही या गौप्यस्फोटाकडं लक्ष वेधलं गेलं नाही. तसेच फडणवीसांनीही याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे पवारांकडे गंभीर तक्रार आलेला हा नेता कोण, याचे गूढ वाढले आहे.

भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी सरकारी वकिलांकडूनच षडयंत्र केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला होता. त्यांनी सादर केलेल्या व्हिडीओमध्ये सरकारी वकिलांकडून शरद पवार यांचेही नाव घेण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यावर पवारांनी 9 मार्च रोजी पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये त्यांनी विनाकारण एखाद्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधींना दिल्या जात असलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
सत्ताधारी अन् विरोधकांपुढे नितीन राऊत झुकले; शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा

पवारांनी यावेळी एक उदाहरण देत फडणवीसांच्या एका सहकाऱ्याबाबत आपल्याकडे गंभीर तक्रार आल्याचे सांगितले. ते म्हणाले होते की, कधीकाळी वर्ष-सहा महिन्यामध्ये माझ्याकडे एक गंभीर तक्रार आली होती. ती तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यासंदर्भात असल्यामुळे त्याची माहिती मी स्वत: फडणवीस यांना कळवली. त्यांना हेही सांगितलं की, यात सत्यता किती हे तुम्हीही पहा. तुमच्या सहकाऱ्यासंदर्भात ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधित्व करते. तिच्याबद्दलच्या तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय मी जाहीरपणे बोलणार नाही. त्यामुळे आपण पाहून घ्यावं, असं पवारांनी सांगितलं.

त्यानंतर त्यांच्याकडून (फडणवीस) मला एवढंच कळवलं गेलं की, तुम्ही पाठवलेल्या लोकांच्या तक्रारीमध्ये मी लक्ष घातलंय आणि अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. हा प्रश्न माझ्यामते तिथंच संपला, असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं. पवारांच्या या गौप्यस्फोटाबाबत त्यावेळी फारशी चर्चा झाली नाही. माध्यमांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष वेधलं गेलं नाही. त्यावर फडणवीसांकडूनही काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे पवारांनी उल्लेख केलेले फडणवीसांचे सहकारी कोण, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांनी अशा गोष्टी यापुढे होणार नाही, असं म्हटलं होते. त्यामुळे ही तक्रार नेमकी काय होती, याबाबतही तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. याचं गुढ आता वाढत चाललं आहे.

Devendra Fadnavis, Sharad Pawar
गुलाबराव देवकरांचं नाव घेताच फडणवीसांवर अनिल पाटलांचा विधानसभेतच पलटवार

दरम्यान, या पत्रकार परिषदेबाबत पवारांनी फेसबुकवरही काही मुद्दे मांडले होते. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनात प्रतिनिधीत्व करत असते त्यावेळेस तिच्या संदर्भातील तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून, वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन लोकप्रतिनिधींना नाउमेद करण्याचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये ही संख्या अधिक आहे. सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला.

एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायचा काही संबंधच नाही. मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा हे निरर्थक आहे. एक पक्ष म्हणून आम्ही सदैव त्यांच्याशी पाठीशी मजबुतीने उभे राहू. खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहचवलेला आहे. देशाचे पंतप्रधान याची खोलात जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com