
सातारा : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची,संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या ज्येष्ठ संशोधक -लेखिका गेल ऑम्व्हेट यांचे (वय ८१) आज (ता.२५) वृद्धापकाळाने निधन झाले. Internationally renowned sociologist Dr. Gail Omvet passed away
त्यांच्यावर गुरुवार ता. २६ रोजी सकाळी १० वा. कासेगाव जि. सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गेल यांना लॉकडाऊननंतर चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखे खाली वैद्यकीय उपचार सुरू होते. डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या.
अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.
डॉ. गेल यांनी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता त्यांनी भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्त्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. तेथून त्यांचा वादळी प्रवास सुरू झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले.
डॉ. गेल आणि डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री, जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला. अफाट वाचनशक्ती आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहित राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकार आणि सहभाग घेत राहिल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या.
तत्कालिन खानापूर (जि. सांगली) तालुक्यात मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात त्यांचा पुढाकार राहिला. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकार आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या. डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे.
डॉ. गेल यांची २५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, दलित अॅण्ड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची, जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्तव्यास असून तेथे वेगवेगळ्या चळवळीत ते सहभागी असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.