आधार भावात वाढीसाठी किसान सभा उतरणार रस्त्यावर : डॉ.अजित नवले   

किसान सभा शेतक-यांवरील अन्यायाचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करण्याची घोषणा करत आहे. -डॉ.अजित नवले
AJIT_NAVLE
AJIT_NAVLE

मुंबई :  मोदी सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधार भावात अत्यंत केविलवाणी वाढ करून शेतक-यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे, असा आरोप  डॉ. अशोक ढवळे ,आ. जे.पी. गावीत, किसन गुजर आणि अर्जुन आडे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे . 

आपल्या निवेदनात ते म्हणतात, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रमुख पिकांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. गेल्या हंगामात आधार भावात यानुसार थोडी बहुत वाढही केली होती. पुढेही टप्प्याटप्प्याने अशीच वाढ करून शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन शेतक-यांना दिले होते.

मात्र निवडणुका संपताच मोदी सरकारने शेतक-यांना आपला खरा चेहरा दाखवत आधार  भावात सातत्याने भरीव वाढ करण्याच्या आपल्या घोषणेला हरताळ फासला आहे. गेल्या हंगामात दिलेली वाढ व वाढता उत्पादन खर्च पहाता जाहीर केलेले आधार भाव शेतक-यांना आणखी हतबल करणारे ठरले आहेत. शेतकरी नव्या हंगामात पेरणी लागवडीच्या लगबगीत असताना मोदी सरकारने शेतक-यांना दिलेल्या या 'भेटी'मुळे देशभरातील शेतक-यांच्या मनोबलाचे आणखी खच्चीकरण झाले आहे.  

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हमी भावात उडदाच्या हमी भावात २००० रुपयांनी, मुगाच्या हमी भावात १४०० रुपयांनी, कापसासाठी ११३० रुपयांनी, मकासाठी २७५ रुपयांनी तर भातासाठी २०० रुपयांनी वाढ केली होती. आता निवडणुकांनंतर २०१९-२०च्या हंगामासाठी मात्र आधार भावात उडदासाठी केवळ १०० रुपये, मुगासाठी ७५ रुपये, कापसासाठी १०५ रुपये, मकासाठी ६० रुपये, भातासाठी केवळ ६५ रुपये वाढ केली आहे. निवडणुका संपताच शेतक-यांची आम्हाला आता गरज नसल्याचा संदेशच मोदी सरकारने या तुटपुंज्या हमी भावातून देशवासीयांना दिला आहे.

सरकारी धोरणांचा परिणाम असलेल्या शेती संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमी भाव मागत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आधार भाव ठरविण्यासाठी शेतीमालाचा  सर्वंकष उत्पादन खर्च विचारात घेतला जावा अशी शेतक-यांची मागणी आहे. गत वर्षी सरकारने हमी भावात वाढ केली होती. मात्र आधार भाव ठरविताना सर्वंकष उत्पादन खर्च  विचारात न घेता केवळ निविष्ठाचा खर्च व कुटुंबाची मजुरीच  विचारात घेतली होती.

यंदाचे जाहीर करण्यात आलेले आधार भाव पाहता आता निविष्ठाचा रास्त खर्च व कुटुंबाची रास्त मजुरी सुद्धा विचारात घेण्यात आलेली नाही हे उघड आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. किसान सभा शेतक-यांवरील या अन्यायाचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करण्याची घोषणा करत आहे. सरकारने आधार भावात तातडीने दुरुस्ती करून सर्वंकष उत्पादन खर्च विचारात घेत दीडपट आधार भावाची घोषणा करावी अशी मागणी किसान सभा करत आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com