Dombivli News : लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली असून, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आणि बेकायदा पद्धतीने लावणाऱ्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. कल्याण शीळ रोड परिसरात बेकायदेशीर लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होर्डिंगवर कारवाई करत प्रशासनाने ते काढून टाकले.
कल्याण शीळ रोड परिसरात पंतप्रधान यांचे मोदी की गॅरंटी असे आशय असलेले जाहिरात फलक लावण्यात आल्याची तक्रार निवडणूक (Election) विभागाकडे करण्यात आली होती. याची शहानिशा करत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने एका रात्रीत हे फलक काढून टाकले. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे फलक लावण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे होर्डिंग काढून टाकले. या प्रकरणी जाहिरात एजन्सीवर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडीएमसी हद्दीत आचारसंहितेचा हा पहिला गुन्हा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे फलक, ध्वज काढण्यात आले आहेत. पक्षाची चिन्हे, नावे झाकण्यात आली आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता आचारसंहितेचा भंग करत हे होर्डिंग लावले असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत केडीएमसीने या होर्डिंगवर कारवाई केली. आचारसंहितेचा भंग झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडीएमसी ई प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार यांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून मानपाडा पोलिस (Police) ठाण्यात कळवा येथील ए.डी. प्रमोशन अॅडव्हर्टायझिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी निवडणूक विभागाच्या अॅपवर या जाहिरात फलकाची तक्रार मिळाली होती. तक्रारीत जाहीरातीचे फोटोंसह परवानगी शिवाय काही ठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले आहेत, असे म्हटले होते.
सहायक आयुक्त भारत पवार यांसह पथकातील कर्मचारी सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड, अरविंद म्हसकर, सावंत पाटील, रतन खुडे, विलास पाटील, भगवान पाटील, अमित गायकर, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी यांनी दावडी रिजन्सी येथे पाहणी केली. या कारवाईनंतर आता पालिका प्रशासन व निवडणूक विभागाने या परिसरात फिरून बेकायदा होर्डिंग, जाहिरात फलक यांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
Edited By : Chaitanya Machale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.