मुंबई : मनसेने (Maharashtra Navnirman Sena) मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. राज्यात बुधवारपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. सध्या सुरू असलेल्या भोंगे प्रकरणाबाबत सामाजिक आणि धार्मिक वातावरण चिघळले आहे. (Loudspeaker controversy news)
भोंगे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey)यांनी सर्वधर्मीय धर्मगुरूंशी संवाद साधला. प्रत्येक प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवावा, अशा सूचना पांडे यांनी धर्मगुरूंना दिल्या.
मंदिर व मशीद प्रशासनाकडून भोंग्यांच्या परवानगीसाठी आयुक्तालयात अर्ज येऊ लागले आहेत. मुंबईत एकूण दोन हजार ४०४ मंदिरांची नोंद असून मंगळवारपर्यंत परवानगीसाठी मंदिरांकडून फक्त २८ अर्ज आले आहेत. त्यातील २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत एक हजार १४४ मशिदी आहेत. त्यातील ९४४ मशिदींनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ९२२ मशिदींना आतापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फक्त अंदाजे एक टक्का मंदिरांनी परवानगी घेतली.
संजय पांडे यांच्यासह सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरातील मशिदी, हिंदू मंदिरे, जैन मंदिरे, चर्च, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळांच्या सुमारे १०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. महिनाभरापासून त्याबाबत चर्चा आणि बैठका घेतल्या जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चार मनसे पदाधिकारी ताब्यात
भोंग्यांद्वारे अजान वाजवणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करणाऱ्या घटनांची चारकोप आणि चांदिवलीमध्ये नोंद झाली आहे. त्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा सहभाग होता. त्यांना एक हजार दोनशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मुंबईतील प्रत्येक भागात मनसे पदाधिकारी आणि कार्यकत्यांची शोध मोहीम पोलिसांकडून सुरू होती. धारावीत चार मनसे पदाधिकाऱ्यांना महाआरतीसंदर्भात पोलिसांनी ताब्यात घेऊन १५१ (२) कलमांतर्गत अटक केली आहे. संदीप कदम, कौशिक कोळी, संदीप कवडे आणि प्रमोद रसाळ अशी त्यांची नावे आहेत. आरसीएफ पोलिसांनीही एकाला अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.