मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जोरदार बॅटिंग करत आपण आणि फडणवीस मिळून आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. तसे जर झाले नाही मी शेती करायला निघून जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. माझ्यासोबत असलेल्या 50 पैकी एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार, असा शब्दही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि आमचा अजेंडा सेम आहे. आमचे 50 आणि त्यांचे 115 असे एकूण 165 आमदार झाले आहोत. पुढील निवडणुकीत ते 200 करू.
शिवसेना सोडलेल्या नेत्यांना पुढे राजकीय भवितव्य नसल्याचे उदाहरण अजितदादांनी आपल्या भाषणात दिले होते. त्याला शिंदे यांनी उत्तर दिले. ज्यांनी शिवसेना सोडली ते सेनाविरोधातील पक्षात गेले होते. आम्ही हिंदुत्व तिकडे गेलो आहोत. त्यामुळे तशी अडचण येणार नाही. चिन्ह काय मिळणार, कधी मिळणार याची काळजी नाही. आपण शिवसेनेवाले आहोत. जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू, पण माझ्यासोबत असलेल्या एकाही आमदाराला कमी पडू देणार नाही
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच मला मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. तसेच 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती असतानाच मुला उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच मला सांगितले होते. पण ते मला मिळणार नाही, याची खात्री होती. कारण हे पद मला आमच्या पक्षाला द्यायचे नव्हते, असाही प्रसंग शिंदे यांना आज विधानसभेत विशद केला. महाविकास आघाडी सरकार असल्याने मला मुख्यमंत्रीपद देता येत नाही, असे आमच्या नेतृत्वाने सांगितले होते. त्यानंतर स्वतः ठाकरे मुख्यमंत्री झाले. मी नाराज झालो नाही. कारण पदासाठी मी कधीच काम केले नाही.
मला मुख्यमंत्र्यांनी विचारलं कुठे चाललात? मी म्हटलो मला माहीत नाही. मला एकाही आमदाराने विचारले नाही, की आपण कुठे चाललो आहोत. अजितदादा, हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. मी ठरवलं जे काय व्हायचं ते होऊ दे. लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचविण्यासाठी शहीद झालो तरी चालेल. माझ्यासोबत असलेल्या आमदारांना मी सांगितले होते की तुमचे सारे हित पाहीन मगच मी जगाचा निरोप घेईन, असा विश्वास त्यांनी मी दिला. हे का झालं, कशासाठीं झालं, याचा कारण शोधायला हवं होते. एकीकडे माझ्याशी चर्चा करायची आणि दुसरीकडे मला पदावरून काढायची, अशी ही वागणूक होती. आमच्या घरावर दगड मारायचे दुसरीकडे दिले गेले. माझ्या घरावर दगड मारणारा अद्याप पैदा झालेला नाही. माझ्यामागे मधमाशांचे पोळे आहे. दगड मारल तर डसून टाकतील. गेली 20-25 वर्षे मी रक्ताच पाणी केलयं. बाळासाहेबांच्या विचाराने मी प्रेरीत झालो आणि शिवसैनिक झालो.
मागील पंधरा दिवस 50 आमदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं. मला आज विश्वास बसत नाही की मी आज या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. आमदार, खासदार, नगरसेवक विरोधाकडून सरकारकडे जातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार बॅटिंग केली.
आम्ही उद्धव ठाकरे यांची सोडली याचं आम्हालाही दुःख आहे.पण आमचं घर जळत आहे. आमच्या घरातील लोक जळत आहे. आम्ही ते उध्वस्त होऊ देणार नाही. लोकांना मान्य असलेला निर्णय आम्ही केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिला निवडणुकीत शिवेसना चौथ्या क्रमांकावर गेली. कोणाला काळजी आहे? चार लोकांच्या कोंडाळ्यामुळे उद्धव ठाकरे हे असे वागतात. शिवसेनेची सत्ता गेली तरी आमच्यासाऱ्यांना व्हॅल्यू नाही. ज्यांची लायकी नाही निवडून यायची ते आमच्यावर बोलतात. आम्हाला डुक्कर बोलतात. अशा लोकांसोबत आम्ही कसे राहणार? एका मंत्र्याला भेटायला गेलो तर फोटो काढायची विनंती केली. पण त्या मंत्र्याने फोटोही काढू दिला नाही, अशी आठवण त्यांनी या वेळी सभागृहात सांगितली. तुम्ही गटार आहात, वरळीतून जाऊ देणार नाही, असे म्हणतात. पण त्याची काळजी करू नका. धमक्या आम्हालाही देता येतात, असा थेट इशारा गुलाबराव यांनी दिला. आम्ही 20 आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे तेव्हा ते म्हणाले होते. ही नाराजी आजची नाही. आमदाराची नाराजी कोरोना काळापासून होती. कोणा आमदारेचेही फोन उचलले जात नव्हते, असे गुलाबरावांनी सांगितले.
शिवसेेनेच्या विरोधात जे सत्तेतून बाहेर पडले त्यांना माझा सॅल्यूट आहे. तसाच एक त्याग देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जयंत पाटील मला तुमचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कधी समजत नाही अजितदादांनी सकाळी शपथ घेतली, हे तुम्ही विसरले का, असा सवाल सुधीर मुनगंटिवार यांनी केला. जयंतराव तुमच्यापैकी अनेक जण माजी आमदार होण्याच्या मार्गावर आहेत. आता फक्त एकच प्रस्ताव ठेवा तो म्हणजे माजी आमदारांची पेन्शन वाढवण्याचा, असा खोचक सल्ला मुनगंटिवार यांनी दिला. सत्ता गेल्याचे पक्ष जयंतराव तुमच्या पक्षाला आहे, अशी टीका मुनगंटिवार यांनी केली.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात आक्रमक भाषण केले. त्यांनी थेट भाजपसह बंडखोरांवरही निशाणा साधला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अनेकदा मध्यस्थी करावी लागली. जाधव यांना नोटीस देण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित झाला. भास्कर जाधव यांचे भाषण सविस्तर वाचा.
आज सभागृहात आमचे मित्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. ही नेहमीची प्रथा आहे की, अशापध्दतीने महाराष्ट्रात बदल घडतो त्यावेळी सगळे मतभेद विसरून, राग-लोभ बाजूला सारून सभागृहाची उंची वाढवावी, त्यात थोडीशी अधिकच भर टाकावी, ही परंपरा आहे. सुरूवातीलाच विनंती करायची आहे की, फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना सांगितलं की दुसरा आवाज लोकशाहीत ऐकला पाहिजे. म्हणून माझी खात्री आहे, मी सभागृहातला दुसरा आवाज आहे. त्यामुळे माझे काही शब्द अजिबात असंसदीय असणार नाही, ते ऐकून घेण्याचे औदार्य दाखवावे.
एकनाथ शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. गेल्या आठ दिवसांत मी झोपलेलो नाही. मी कधी विचलित होत नाही. अस्वस्थ होत नाही. एकनाथ शिंदे आजही सांगत आहेत की, मी शिवसेनेचा आहे. सच्चा शिवसैनिक आहे, असं सांगत आहेत. आनंद दिघेंचा वारसदार असल्याचे सांगत आहेत.
मी राष्ट्रवादीत असताना तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता. मी शिवसेनेत आलो. तुम्ही मंत्री असताना तुमची आणि माझीही मंत्र्यांच्या दालनात एकदाही भेट झाली नाही. कोकणात आलेल्या महापुरावेळी तुम्ही खरा शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले. तुम्ही अनेकांच्या मदतीला धावून जाता, हे खरं आहे. पण आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.
एका बाजूला 40 शिलेदार तुमच्याबाजूला आहेत. तर दुसऱ्या बाजूला सामान्य शिवसैनिक छातीचा कोट करून उभा आहे. कोण कुणाला धारातीर्थी पाडणार आहे, याचा विचार करावा. लढाई छेडण्यापूर्वी कुठे थांबायचे, हे कुणाला कळतं तर तो खरा योध्दा. या महाराष्ट्रात पुन्हा महाभारत घडणार आहे. सत्तेसाठी दोन भाऊ एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत.
पानिपतच्या युध्दाची आठवण यावेळी भास्कर जाधव यांनी करून दिली. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक तुमची कृती सरकार उलथून टाकण्यासाठी होती, अशी टीका त्यांनी भाजपवर केली. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी लढताना पाहिले आहे. पण ही स्थिती आता नव्हती. तुम्ही कधी कुणाच्या हातात भोंगा, हनुमान चालिसा तर कधी कंगना राणावत, नुपूर शर्मा आणली. पण सत्ता उलटली गेली नाही.
या सगळ्यात ज्या भाजपच्या हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही करताय. संजय राठोड यांचं मंत्रिपद घालवण्यासाठी तुम्ही काय-काय केलं. बोला आता त्यांचं काय करणार. प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांची ईडीची चौकशी लावली. आज त्यांच्या घराखाली केंद्र सरकारचे पहारे लावण्यात आले, असं जाधव म्हणाले. त्यानंतर संजय राठोड यांनी माझं नाव घेण्यापूर्वी नोटीस द्यायला हवी होती, असं सांगितलं. तर प्रताप सरनाईक यांनीही दीड वर्षांपूर्वी ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं प्रत्युत्तर दिलं. यामिनी जाधव यांनीही आक्षेप घेतला. यावेळी सभागृहात गोंधळ झाला.
मला माहिती आहे, माझं बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही. कारण वर्मावर घाव पडत आहे. आम्ही तत्वाचे आहोत. ज्यांच्या घरावर ईडी लावली आहे, ते मराठी माणसं आहेत. तुम्हाला फक्त मराठी माणसं दिसत आहेत. किती जणांना धुवून घेणार, असं सांगत जाधव यांनी भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची नावे वाचून दाखवली. त्यानंतर सभागृहात वाद झाला. त्यावर अध्यक्षांनी हस्तक्षेप केला. नियम 35 खाली जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचे भाष्य करता त्यावेळी नोटीस देणं अनिवार्य आहे. त्यामुळे कुठल्याही सदस्याचं नाव घेऊ नका, अन्यथा रेकॉर्डवरून काढलं जाईल, असा इशारा अध्यक्षांनी दिला.
शिवसेना विरूध्द शिवसेना लढवली जात आहे. 25 वर्षात शिवसेना संपविणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. शिवसैनिकांचे रक्त सांडवण्याचा डाव आहे. एकनाथ शिंदे तुम्ही शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे या. शिवसेना फुटू दिली नाही तर हा महाराष्ट्र अखंडपणे तुमचे आभार मानेल, असं म्हणत भास्कर जाधव यांनी भाषणाचा शेवट केला. या भाषणाने भाजपसह सर्वच बंडखोर आमदारांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यान जोरदार गोंधळ झाला.
मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने खूप चांगले काम केले. कोरोनाचं संकट दोन वर्ष होते. वादळं आली. वीजेचं संकट देशपातळीवरचं होतं. पण ही सर्व संकटं चांगल्याप्रकारे हाताळण्याचे काम सरकारने केले. कोरोना संकटामुळे निधी पुरेसा उपलब्ध होत नव्हता. अशा परिस्थितीतही जनतेला मदत करत होतो. सर्व महत्वाची विकासकामे सुरू होती. कुठेही सरकार कमी पडले नाही.
काही अडचणी निर्माण होत होत्या. एक पक्षाचं सरकार असलं तरी कुरबुरी असतात. अलीकडच्या काळात तर दबाव खूप वाढत चालला आहे. आमदार कामांसाठी दबाव टाकत असतात. अशा परिस्थितीतही आम्ही संयमाने तोंड देत होतो. पण टोकाची भूमिका कधीही घेतली नाही. पण एक वाईट वाटतं की, हा बदल तुम्ही करत असताना या बदलावर पुस्तकं लिहिली जातील. या सगळ्यात आपण बंदूक आमच्या खांद्यावर ठेवली, याचं वाईट वाटलं. हे करायला नको होती.
सरकार कसं आलं, हे जनतेला माहिती आहे. कुणावर दबाव आला, हेही माहिती आहे. आता सत्तेवर आल्यानंतर तुम्ही आरेच्या बाबतीतला निर्णय घेतला. याबाबत काही प्रश्न आहेत. तुम्हाला याचा विचार करावा लागेल. आज जुलैचा पहिला आठवडा सुरू आहे. पण अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. अनेक भागात पेरण्या झाल्या नाहीत. अनेक भागात दुबार पेरणीची वेळ आली आहे.
सत्तेचा आनंद आहे, ठीक आहे. पण जनता चार दिवस गुलाल उधळेल. पण तुम्ही त्याच आनंदात राहिला तर जनता प्रश्न विचारेल. आता तुमच्यावर जबाबदारी आहे. जनतेचे तातडीचे प्रश्न विचारात घ्यायला हवेत. हे सभागृह संपल्यानंतर पहिली बैठक राज्याच्या पीकपाण्याबाबत घ्यायला हवी.
देवेंद्रजी, मी तुमचं भाषण बारकाईने ऐकत होतो. तुम्ही समर्थन करत होता. मग मागच्या टर्ममध्ये त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ हे खातेच का दिलं. ज्याचं वजन, भारदस्त असतं त्यांच्याकडे महत्वाची खाती असतात. जर आजचे शिंदे हे सर्वगुणसंपन्न होते तर त्यांना रस्ते विकास महामंडळ का दिले. जनतेशी संबंधित असताना कोणता विभाग का दिला नाही, याचाही विचार झाला पाहिजे.
मागील आठ दिवसात राज्यात बरंच काही घडलं. शिवसेनेचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास टाकून तुन्ही तिकडे गेला. ज्याज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार निवडून आला नाही. राणे यांच्यावेळीही शिवसेना फुटली. त्यावेळी किती आमदार निवडून आले, याचेही आत्मचिंतन करावे.
बऱ्याचशा गोष्टी आज न्यायप्रविष्ट आहेत. परंतु मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येण्याचं काही कारण होतं का. कोर्टाची लढाई कोर्टात चालेल. ठराव घाईत आणण्याची गरज नव्हती. बऱ्याच गोष्टी प्रलंबित ठेवण्याच्या गोष्टी राज्यपालांनी ठेवले. बारा आमदारांचा निर्णयही त्यांनी दिला नाही. आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडवर आले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपालांकडे जात होतो. आम्हाला तारीख देण्याची मागणी करत होतो. पण अध्यक्षांची निवड झाली नाही. आता लगेच ही निवड झाली. सर्व घटना चार दिवसांत खूप वेगात झाल्या. त्यामुळे जनतेच्या मनात शंका उपस्थित होतात.
गेल्या आठ दिवस बरंच काही बघितलं. खरं तर अनेकांना सुरतमध्ये, तिथून गुवाहाटी, तिथून गोवा. आजपर्यंतच्या हयातीत इतक्या दहा दिवसांत आमदारांना फिरायला मिळालं नसेल. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओके, असंही झालं. शहाजीबापू, आपण एकत्र काम केलं आहे. यातून लगेच गोंधळून जायचं कारण नाही. मोठी लोकं कधी एकत्र येतील सांगता येणार नाही.
शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर काही आमदार टेबलवर उभे राहून नाचायला लागले. शेवटी सत्ता येते, जाते. दीपक केसरकर यांनी प्रवक्ते म्हणून ती चूक मान्य केली. अजून मंत्रिमंडळाचे सगंळ स्थिरस्थावर होईपर्यंत बोलायचं नाही, अशी भूमिका सत्तारांसह इतर काहींनी घेतलेली दिसते.
मुख्यमंत्री म्हणून 106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. पण 40 आमदार असलेले मुख्यमंत्री होतात. यात काहीतरी काळंबेरं आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या 105 मुळं तुमचं मुख्यमंत्रिपद आहे, असं भाजपचे आमदार बोलतील. हा मनुष्य स्वभाव आहे.
सुरतला जाण्याआधी सत्तार हे दोन तास आमच्यासोबत गप्पा मारून गेले. शिंदेसाहेब तुम्ही आजपासून कारभार पाहणार आहेत. लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानूनच काम करावे लागेल. पण आत्ताचे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसेनेचे सांगतील. शिवसेनेच्या नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. ते आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल.
तीन पक्षांचं सरकार तयार होत असताना तीनही पक्षांचे नेते चर्चा करत होते, लोकांमध्येही चर्चा होती की, एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे येईल, असं वातावरण होतं. पण उद्धवजींना आग्रह केल्यानं त्यांनी जबाबदारी स्वीकारली. शिंदे यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे की, भाजपची स्थापना झाल्यापासून शिवसेनेची मदत घेऊन पक्ष वाढवत नेला. 2014 मध्ये भाजपचे 122 तर आता 105 आमदार आहेत. एकंदरीत शिवसेनेसोबत राहून भाजपने ताकद वाढवण्याचं काम केलं.
आताही शिंदे त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार. पण शिंदेसाहेब, मी आजपर्यंत कुणाला बोललो नाही की, तिकडे गेल्यानंतर आमच्यावर राष्ट्रवादीने अन्याय केला, असा पाढा वाचण्याचं काम अनेकांनी केलं. पण असा भेदभाव कधीच केला नाही. उलट आमदार निधी एक कोटीवरून पाच कोटीपर्यंत नेला. मी भेदभाव करणारा माणूस नाही. नगरविकास, पर्यटन सर्वच खात्याला निधी दिला.
मुख्यमंत्रीच शेवटी निधीवर हात फिरवतात. शिवभोजन केंद्राच्या वाटपात 1200 केंद्र मंजूर केली. त्यातील 401 शिवसेना आमदार-खासदारांच्या शिफारशीनं मंजूर झाली. एकनाथ शिंदे, संदीपान भूमरे, उदय सामंत तुम्हाला कधीच मोकळ्या हाताने परत पाठवले नाही.
अनैसर्गिक आघाडी झाली असं तुम्हाला वाटत असेल. पण कारण नसताना राष्ट्रवादीला बदनाम केले गेले, ते मनातून काढून टाकावे, ही आग्रही भूमिका आहे. शिंदे हे रिक्षाचालकापासून इथपर्यंतचा पल्ला गाठणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. पण हे करत असताना उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन केले असते, तर वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. इथून पुढे चांगले काम करत असताना आमचं सगळ्यांचं सरकारला सहकार्य राहील. जिथं राज्याचं हित पाहिले जाणार नाही, तिथे विरोधक म्हणून आम्ही ते लक्षात आणून देण्याचे काम करू.
समृध्दी महामार्गाचे काम आज एक टप्पा जवळजवळ पूर्ण होत आला आहे. पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन समस्य़ा सोडवल्या, त्या व्यक्तीचे नाव एकनाथ शिंदे आहे. त्यातून त्यांनी आपल्या कामाची झलक दाखवली.
एकनाथ शिंदे यांनी अशी अनेक प्रकल्प अतिशय चांगल्याप्रकारे राबविले. त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून चांगले काम केले. त्यांचा हा आवडता विषय आहे. सामान्य व्यक्तींकडे सर्व सुविधा मिळायला हवा, असा त्यांचा आग्रह असायचा. ठिकठिकाणी जाऊन त्यांनी चांगल्याप्रकारे व्यवस्था उभ्या केल्या.
एकनाथ शिंदे हे वेगळं रसायन आहे. त्यांना मी अनेकदा म्हणतो, तुम्ही झोपता कधी हे समजत नाही. चोवीस तास काम करणारा हा नेता आहे. विशेषत: एखादी निवडणूक असते त्यावेळी सलग तीन-तीन दिवस काम करतात. पण अनेकदा पदं मिळाल्यानंतर आपण माणुसकीचा भाव हरवतो. पण त्यांच्याजवळ प्रचंड माणुसकी आहे. लहानातल्या लहान माणसासाठी धावून ते जातात.
मागील काही काळात एक पोस्ट केली, सरकारविरोधात बोलले म्हणून जेलमध्ये टाकले जात होते. हे चांगलं नाही. आजही शिंदे हे रोज 400 ते 500 लोकांना भेटतात. मुख्यंमत्री तुम्ही आहात तर त्यांनी थोडी वेळ काढली पाहिजे, असं मी त्यांना सांगतो. त्यांना सांगितलंय की, थोडं वेळ पाळा. आता त्यांनी सुरूवातही केली आहे. आता येणाऱ्या काळात ते चांगलं काम करतील.
कमी बोलायचं आणि काम अधिक करायचं. अनेकदा शांत बसलेले असतात. प्रचंड पेशन्स आहेत. त्यांची ही जडणघडण त्यातूनच झाली आहे. लहानपणी गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यामुळे त्यावेळी ते दहावीपर्यंतच शिकले. पण संधी मिळाल्यानंतर वयाच्या 56 व्या वर्षी डिग्री मिळवली आणि 77 टक्के गुण घेत पदवी मिळवली. हा निर्धार अत्यंत महत्वाचा आहे.
महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे, टिकणार नाही. मी एक कविता म्हणालो होतो, मी पुन्हा येईन. त्यावर माझी खुप टिंगलटवाळी अनेकांनी केली. पण मी आलो. एकटा आलो नाही, यांनाही सोबत घेऊन आलो. ज्यांनी टिंगलटवाळी केली, अपमान केला त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच आहे की, मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घेऊ नयेत. दुनिया के सारे शौक पाले नही जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नही जाते. कोशिशे करने से हर का होते है आसान, तकदीर के भरोसे टाले नही जातेे.
सातत्याने संघर्ष केला. जनतेते राहिलो. काही लोकांना असं वाटायचो, आम्ही सत्तेसाठी काही करतोय. पण आमचा विचारच हे सांगतो की, सत्ता हे आमचं साध्य नव्हे साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनासाठी एक उपक्रम म्हणून आम्ही सत्ता हवी आहे. आमचे नेते मोदीजी यांनी या देशात दाखवून दिले की आमच्याकडे सत्ता महत्वाची नाही. आमची खंत होती की, जनतेने सत्ता देऊनही आमचे मॅनटेड हिरावून नेण्याचा प्रयत्न झाला. आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका सच्चा कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवू, असं मोदी म्हणाले होते. माझ्या नेत्यांनी मला आदेश दिला की, या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केला.
ज्या पक्षाने मला सर्वोच्चस्थानी बसवले, त्या पक्षाने मला घरी बसण्यासाठी सांगितले असते तरी बसलो असतो. शिंदे यांच्या पाठिशी मी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांची कारकीर्द अधिक यशस्वी कशी होईल, यासाठी प्रयत्न करेन. दोघांमध्ये दुरावा, कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही. आम्ही विरोधी बाकांवर होतो. पण आमची मैत्री कायम राहिली.
सरकार बनल्यानंतर आता सर्वांनी मोकळ्या मनाने स्वीकारायला हवी. शरद पवार यांनीही संघाच्या शिस्तीबाबत गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. मनसे नेते राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिले. पण त्यांच्यासारखे शब्द सुचले नाहीत.
आपण सर्व राजकीय विरोधक आहोत, आपण शत्रू नाही. काही लोकं ईडी, ईडी ओरडत होते. ते खरंच आहेत, ते ईडीमुळेच आले आहेत. पण ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. राजकारणात दोन्ही बाजू असतात. आमच्या एका-एका नेत्यावर 35 खटले टाकले. गिरीश महाजन यांच्यावर तर मोका लागणार होता.
महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी स्थिती नाही. आम्ही आतही एकमेकांच्या घरी जाऊ शकतो. दक्षिणेत सत्ताधारी आणि विरोधक खून के प्यासे आहेत. सुदैवाने इथे ही स्थिती नाही. भूमिका बदलत असतात, सत्ता येते आणि जाते. सत्तेचा अहंकार कधीही डोक्यात जाऊ नये.
कित्येक लोकं आहेत. कुणी कुणाबद्दल वाईट लिहू नये, ते चुकीचे आहे. पण एका पोस्टनंतर पंधरा-पंधरा दिवस लोक जेलमध्ये ठेवतात. हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम मागे घेऊनही महिला खासदाराला 12 दिवस जेलमध्ये ठेवले. दोन्ही कडच्या व्यथा दूर कशा करता येतील, यावर चर्चा व्हायला हवी.
बदल्याच्या भावनेने, आकसाने हे सरकार काम करणार नाही. मेरिटप्रमाणे सर्व निर्णय घेतले जातील, काही निर्णय बदलले जातील. राज्यात नेत्यांच्या उपलब्धतेची कमतरता तयार झाली होती. आता येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल. भलेही शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काही निर्णय घेतले. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कॅबिनेटची मिटींग घ्यायची नसते, हा संकेत आहे. पण त्यानंतरही तुम्ही संभाजीनगर, धाराशीव असे वेगळे निर्णय घेतले. आमचीही भूमिका तीच आहे. त्यामुळे तुमच्या शेवटच्या कॅबिनेटचे निर्णय पुन्हा घेऊन ते लागू करण्याचे काम हे सरकार करेल, असा विश्वास देतो. विरोधकांनीही आपले मोलाचे सहकार्य द्यावे, असं आवाहनही फडणवीसांनी केले.
शिंदे सरकारने 164 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर विरोधकांच्या बाजूने केवळ 99 मतदान झाले. सरकारला शंभरीही गाठता आली नाही, त्यामुळे नामुष्की ओढवली. समाजवादी पक्ष, एमआयएम या पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चाचणीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर त्यांनी सरकारने विश्वासदर्शक प्रस्ताव संमत झाल्याचे त्यांनी घोषित केले. काँग्रेसचे जवळपास पाच आमदार अनुपस्थित राहिले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे बहुमत चाचणीवेळीही तटस्थ राहिले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कोणाच्याही बाजूने मतदान केले नव्हते. यावेळीही त्यांनी हीच भूमिका घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सुहास कांदे यांनी 144 आणि बालाजी कल्याणकर यांनी 145 आकडा घेताच सरकारमधील सदस्यांनी जल्लोष केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सरकार सलग दुसऱ्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सरकारच्या बाजूने 164 मतं मिळाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही सरकारच्या बाजूने 164 मतं होती. राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर संतोष बांगर शिंदे गटात सहभागी झाल्याने हा आकडा 164 वर राहिला. तर बांगर वगळता अन्य कोणतेही आमदार शिंदे गटात सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी बहुमत चाचणीत सहभागी होता येणार नाही. शिरगणतीला सुरूवात झाल्यानंतर ते विधानभवनात दाखल झाले. पण तोपर्यंत सभागृहाचे दरवाजे नियमाप्रमाणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी त्यांना मतदानात सहभागी होता येणार नाही. सरकारकडील मतांचा आकडाही त्यामुळे कमी होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे आमदार संतोष बांगर यांनी आज सरकारच्या बाजूने मतदान केले. शिरगणतीसाठी संतोष बांगर यांनी नाव घेताच विरोधकांकडून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
विश्वासदर्शक ठरावावर मतदानाला सुरूवात झाली आहे. शिरगणती करून मतं मोजणी केली जात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत सरकारच्या बाजूने 164 आमदार होते. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कालपर्यंत ठाकरेंच्या बाजूने असलेले आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले आहेत.
विश्वासदर्शक ठरावावर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आमदारांची शिरगणती करून मतदान होणार आहे.
विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळा विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेला सुरूवात होईल. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत असल्याचा प्रस्ताव मांडला. भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यानंतर अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतदानास टाकला.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदानही केले होते. पण बहुमत चाचणीवेळी आता ते सरकारच्या बाजूने असतील. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर बांगर यांचे मनपरिवर्तन झाल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच ते शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर सकाळी शिंदे यांच्यासोबतच ते विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांची संख्या 40 वर गेली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यामागे शिवसेनेतील 39 आमदार गेले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने केवळ त्यांचे 16 आमदार होते. तर बंडखोर 39 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले. दोन्ही गटांनी व्हीप बजावले होते. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. आता बहुमत चाचणीवेळीही व्हीप बजावण्यात आला आहे. त्यावरूनही दोन्ही गट आमनेसामने येणार आहे. नवनियुक्त अध्यक्षांनी शिंदे हेच गटनेता आणि भरत गोगावले हे प्रतोद असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडील 16 आमदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास एकही आमदार ठाकरे यांच्या बाजूने राहणार नाही, याची भीती शिवसेनेला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या बाजूने 164 तर विरोधकांच्या बाजूने 107 मतं मिळाली होती. आता बहुमत चाचणीत सरकारला 166 मतं मिळतील, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या गोटातील दोन मतं सरकारला मिळतील, असे संकेत दरेकर यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 145 चा जादुई आकडा गाठत त्यांना सरकारकडे बहुमत असल्याचे सिध्द करावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारकडे 164 मतं असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बहुमत चाचणीचा कौलही सरकारच्या बाजूने लागणार असल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.