Maratha reservation Protestors : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत उपोषणाला बसण्याची घोषणा केलेली आहे. यासाठी जरांगे-पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग आता मनोज जरांगे यांनी जाहीर केला आहे.
20 जानेवारीला अंतरवाली सराटी येथून सर्व मराठा बांधव निघणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात अंतरवाली सराटीतून होणार आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई पायी प्रवास मराठा बांधव करणार आहेत. पायी प्रवासात सर्व मराठा समाजाने सहभागी होण्याचे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. तसेच आपल्या मुलांना आरक्षण देण्याची ही शेवटची वेळ असल्याचेही ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईकडे जाण्याच्या या मार्गावर असणाऱ्या गावकऱ्यांनी मोर्चातील मराठ्यांना सहकार्य करावं, जेवणाची, पाण्याची सोय करावी, असे आवाहन करत जेवढं शक्य आहे, तेवढ्या रोजच्या वापरातील वस्तू बरोबर घेण्याचे आवाहन या मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना जरांगे-पाटील यांनी केले.
"20 जानेवारीला मुंबईकडे निघाल्यावर आरक्षण घेऊनच मागे येणार आहोत. या आपल्या मोर्चात कुणीही बाहेरचं शिरलं तर त्यांना पोलिसांच्या हवाली करा, या देशाने कधी पाहिलं नसेल असे आंदोलन आपण करणार आहोत. आता सण नंतर साजरे करायचे, पण आपलं ध्येय फक्त आरक्षण हेच, एकदा घराबाहेर पडलं की आरक्षण घेऊनच वापस येऊ, आंदोलनावेळी कुणीही उद्रेक करु नये", असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना केले.
जालना, शहागड, गेवराई (बीड), खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, सुपा, शिरुर, वाघोली, पुणे, पुणे-मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदान, असा मुंबईत जाण्याचा मार्ग ठरला आहे. दरम्यान, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईत उपोषणाला बसणार आहेत, तसेच लाखोंचा मोर्चा मुंबईत दाखल होणार असल्यामुळे सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.