मुंबई : घाटकोपर येथे आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या स्वागत फलकावर 'हिंदुहृदय सम्राट' असं संबोधलं होतं, त्यावर सोशल मीडियावर 'हिंदू हृदयसम्राट' अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर मनसेने मनसैनिकांना फर्मान काढले होते.
''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (मराठी हृदयसम्राट) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे,'' अशा सूचना कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना देण्यात आल्या आहेत. आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे मराठी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र्य लढण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी माणसांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मनसेने मराठी भाषा दिन जोरदार साजरा करण्याचे ठरवलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत पत्रक काढून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.
''मराठी दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज “मराठी भाषा गौरव दिवस” आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा,'' अशा सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मनसैनिकांना पाठविलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात..
२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात “मराठी भाषा गौरव दिवस” म्हणून साजरा करतो. “गौरव दिवस”. पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.
हा आपल्या भाषेचा “गौरव” दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा.
आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा “गौरव” दिवस आहे हा.
मराठी भाषेचा जयजयकार
संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची ? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच ! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा.
ह्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज “मराठी भाषा गौरव दिवस” आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा !
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.