बिजवडी (ता. माण) : "दुष्काळी माण तालुक्यात जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. तर काही भागात पाणी आले आहे. त्यामुळे माणचे चित्र बदलू लागले आहे. या पुढे जाऊन आता बंगळूर-मुंबई आर्थिक क्षेत्रांतर्गत माण तालुक्यातील म्हसवड व धुळदेव येथे आठ हजार एकर क्षेत्रात एमआयडीसी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. लवकरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
सुभेदार म्हणाले, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात एमआयडीसीचे क्षेत्र विकसित करू, असे सांगितले होते. त्याची आज पूर्तता होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री. रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ अनबलगन यांनी त्यासाठी प्रयत्न केले.''
"दुष्काळी माण तालुक्याचा विकास साधण्यासाठी एमआयडीसी उभारली जाणार आहे. त्यामुळे माण, खटाव, जत, आटपाडी, सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्यातील युवकांना उद्योग उभारण्याची संधी मिळणार आहे. त्या हेतूनेच म्हसवड, धुळदेवमधील सलग क्षेत्राची पाहणी केल्यानंतर एमआयडीसीसाठी ही जागा योग्य असल्याची शिफारस आमच्या समितीने वरिष्ठांकडे केली होती.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तेही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हसवड, धुळदेव येथे आठ हजार एकर जागेवर ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. त्यामध्ये 300 हेक्टर जमीन सरकारी असेल. उर्वरित जमीन शेतकऱ्यांची आहे.
दर निश्चितीनंतर म्हसवड व धुळदेवला रेडीरेकनर दराप्रमाणे पैसे देऊन राज्य शासनाच्या वतीने एमआयडीसीसाठी हे क्षेत्र ताब्यात घेतले जाईल. वर्षाच्या कालावधीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल. केंद्र शासन यासाठी निधी देणार आहे. सातारा एमआयडीसीसाठी संगम माहुलीतून कृष्णेतून पाणी उचलले जाते. तेथूनच म्हसवड एमआयडीसीसाठी पाणी आणले जाईल.''
म्हसवड, धुळदेव एमआयडीसी प्रकल्प मंजूर झाला आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्रस्तरावर प्रयत्न करावेत. दोन-तीन वर्षे या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना यश आल्यामुळे आनंद होत आहे.
- अविनाश सुभेदार (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.