मुंबई : देशात दोनच हिंदुहृदयसम्राट आहेत. एक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), असा टोला अमरावतीचे आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला. तसेच, तुम्ही भडकावू भाषण दिले तरी तुमच्यावर कारवाई होत नाही. पण, आमच्यावर कारवाई करताना मागे पुढे पाहिले जात नाही. कारण, आमचा जन्म ठाकरे कुटुंबात झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी राज यांच्यावर केली. (MLA Ravi Rana criticizes Raj Thackeray)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (ता. २२ मे) पुण्यात सभा झाली. त्या सभेत राणा दाम्पत्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. त्याला आमदार रवि राणा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आमचा गुन्हा काय होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राज्यावर आलेले संकट दूर व्हावे, यासाठी आम्ही हनुमान जयंतीदिवशी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी, अशी विनंती केली होती. मात्र, त्यादिवशी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यास शिवसैनिकांनी आम्हाला विरोध केला. आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून आम्हाला १४ दिवस कारागृहात टाकले. एका महिला खासदारास कारागृहात टाकले, त्यावर राज ठाकरे एक शब्द बोलत नाहीत. आमच्यासारख्या हिंदुवर अन्याय होतो, त्यावेही राज ठाकरे बोलत नाहीत.
राज ठाकरे यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा औरंगाबादमध्ये सभा घेता, भडकाऊ भाषण देता, त्यावेळी तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल होत नाही. कारण, तुम्ही जेव्हा सभा घेता, तेव्हा मॅच फिक्सिंग करता. त्यामुळे तुमच्यावर कोणती कारवाई होत नाही. औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांवर कारवाई होत नाही. कारण, त्या ठिकाणी राजकारण आडवे येते. आमचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला, कुठल्याही ठाकरे कुटुंबात झालेला नाही, त्यामुळे आमच्यावर कारवाई करताना मागेपुढे पाहिले जात नाही. तेव्हा तुम्हाला हिंदूची आठवण येत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे, अशी टीका राणा यांनी केली.
राजसाहेब, तुम्ही किती वेळा यू टर्न घेतला, हे स्वतःला विचारून पहा
मातोश्री ही मशिद नाही; तर हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. त्या ठिाकणी हनुमान चालिसा वाचणं, राजद्रोह होऊ शकत नाही. तरीही आमच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर तुम्ही काहीही बोलले नाहीत. देशात दोनच हिंदुहृदयसम्राट आहेत. एक बाळासाहेब ठाकरे व दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी हे देशातील सर्व हिंदूंची सेवा करत आहे, त्यांच्यासाठी झटत आहेत. टीका करताना विचार करा की आपण किती आंदोलने केली आणि कितीवेळा जेलमध्ये गेलात, कितीवेळा यू टर्न घेतला, हे तुम्ही स्वतः पहा; मगच दुसऱ्यावर टीका करा, असा सल्लाही रावि राणा यांनी राज ठाकरे यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.