मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा खेचून आणून एकमेकांना शह देण्यासाठी भाजप आणि काँग्रेसही समीकरणे जुळवत आहे. या लढतीत पक्षापेक्षा आपापल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) आणि काँग्रेसचे भाई जगताप (Bhai Jagtap) हे झटत आहेत. त्यामुळे पुन्हा आमदार होऊन भाजपमधील आपले 'वजन' कायम ठेवण्यासाठी धडपणाऱ्या लाड यांना पुढचा आठवडा पायाला भिंगरी लागून मते गोळा करावी लागतील. तर भाईंनीही हक्काच्या मतांसह वैयक्तिक करिष्म्यावरही काही मते फोडण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहेत. (MLC Election Latest News)
निवडणुकीत लाड आणि भाईमधील संघर्ष लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. या निवडणुकीत पाचव्या जागेवर उमेदवार दिल्यानंतर ही जागा जिंकणे सोपं नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तर काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणताता नाकीनऊ येणार आहे. तरीही, या दोन्ही पक्षांच्या भूमिकांमुळे निवडणूक होत आहे. (Congress and BJP Candidate Latest News)
विजयासाठी २७ मते आवश्यक असली, तरीही भाजपकडे म्हणजे लाड यांच्या विजयासाठी आठ-दहा नव्हे; तर चक्क २२ मते फोडावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिकांसाठी नऊ-दहा मते फोडली. पण विधान परिषदेला ते शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाड यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा आहे. त्यामुळे लाड यांना केवळ पक्ष आणि फडणवीस यांच्या चालींवर अवलंबून राहाता येणार नाही.
दुसरीकडे, लाड पुन्हा विधान परिषदेत आलेच; तर ते काही नेत्यांना डोईजड होण्याची भीतीही अनेकांना आहे. या चक्रात फसण्यापेक्षा लाड यांना एकेका मतासाठी स्वपक्षीयांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे घर, ऑफिसचे उंबरठे गाठावे लागणार आहेत. काँग्रेसची ताकद कमी असली तरी, भाई जगताप हे काही निवडणुकीत कमी पडणार नाहीत.
भाईंचे जुने संबंध पाहता, राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे झुकलेली काही मते भाईच्या पारड्यात पडू शकतात, हेही याचा अंदाज लाड यांना असावाच. भाईनीही या निवडणुकीत काँग्रेसशिवाय काही आपली व्यूहरचना तयारी ठेवली असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील काही नेत्यांकडून दगाफटका होण्याची शक्यताही त्यांनी गृहीत धरल्याचे समजते. त्यामुळे लाड आणि भाई यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीचा ठरण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.
ही निवडणूक जिंकण्यासाठी लाड आणि भाई हे सगळ्याच 'अर्थ'नी सक्षम असल्याने घोडेबाजार झाला; तरीही हे दोघे कुठेच कमी पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे या दोघांना समोरासमोर आणून भाजप-काँग्रेसनेही पक्षीय पातळीवर ओझे थोडे कमी केल्याचे दिसत आहे. विधान परिषदेसाठी येत्या २० जूनला मतदान होणार असून, त्यातील दहा जागांसाठी ११ उमेदवार उमेदवार आहेत. या निवडणुकीत आमदारांची फाटाफूट होऊ शकते, या भीतीपोटी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.