Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. आज (बुधवारी) गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत.
मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी जोरदार घोषणाबाजी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सकाळी विरोधकांनी केली. काल सीमावादावर विधिमंडळात ठराव मंजूर झाल्यानंतर आज पुन्हा विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
गायरान जमीन घोटाळा प्रकरणात काल (मंगळवारी) कृषिमंत्री अब्दुल सत्तार विधानसभेत आपली बाजू मांडणार होते. मात्र, काल अब्दुल सत्तार विधानसभेत काहीच बोलले नाहीत. आज (बुधवारी) अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर झालेले आरोपांवर विधानसभेत स्पष्टीकरण दिले.
सत्तार यांनी या प्रकरणावर सविस्तर स्पष्टीकरण दिले. सत्तार म्हणाले, "नियमाप्रमाणे या गायरान जमिनीचं वाटप केले आहे.या प्रकरणात न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल, या गायरान जमीन वाटपामुळे सरकारचे कुठलेही नुकसान झालेले नाही," अब्दुल सत्तारांच्या स्पष्टीकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांची बाजू अधिक स्पष्ट केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत 'नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यावेळी आमदारांच्या हातात संत्रीही होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रोहीत पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
"शिंदे-फडणवीस सरकार हे गद्दार सरकार आहे. हे सरकार अनैतिक, घटनाबाह्य सरकार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भष्ट्रमंत्र्यांची हकालपट्टी करणार का ?,"असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात बेकायदा सरकार आहे. त्यामुळेच सीमावादावर सरकारकडून कर्नाटकविरोधात ठाम व आक्रमक भूमिका घेतली जात नाही. आम्ही कर्नाटकची नव्हे तर महाराष्ट्राचीच भूमिका मागत आहोत, असे प्रत्युत्तरही आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.