मुंबई : विधानसभेच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे नेहमीच खटके उडत असतात. मात्र आज ऊर्जा खात्यावरील चर्चेत दोघे एकत्र आले आणि त्यांनी त्या खात्याचे मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना कोंडित पकडले. आपल्याच पक्षातील मंत्र्याला शक्यतो जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. पण राऊत आणि पटोले यांच्यातील `दोस्ताना` हा सर्वश्रूत असल्याने सभागृहात त्याचे पडसाद उमटले. पटोले यांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदाराप्रमाणे राऊत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विधानसभेतील या `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्या साहजिकच उडाल्या.
राज्यात वीज कनेक्शन तोडले जात असल्याबद्दल ऊर्जा खात्यावर लक्षवेधी होती. फडणवीस यांच्यासह इतर सत्ताधारी सदस्यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. डीपी मिळत नाही, रस्त्यावरील दिवे सुरू नाहीत, भरमसाठ वीजबिले अशा अनेक तक्रारी या वेळी करण्यात आल्या. पथदिवे बंद असल्याने हजारो गावे अंधारात असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी लावून धरला. ग्रामविकास आणि नगरविकास खात्याने ही थकबाकी भरावी आणि ती भरेपर्यंत वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
नाना पटोले यांनीही फडणवीस यांच्या मागणीला पाठिंबा दिला. ग्रामीण भागात कृषी पंपाला किमान बारा वीज मिळावी. 2017 ते 2019 असा दुष्काळ असतानाही तेव्हाची वीजबिले आता दिली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांता मोठा रोष असल्याचा मुद्दा पटोले यांनी लावून धरला. विविध प्रश्न विचारून पटोले यांनी राऊतांना अडचणीत आणले. विशेष म्हणजे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांना 'ऊर्जा' खात्यात विशेष रस होता. त्यामुळे आज सभागृहात संधी मिळताच नाना पटोले यांनी उर्जामंत्र्यांना अडचणीत आणल्याचे चित्र होते.
याला उत्तर देताना राऊत यांनी कृषी ग्राहकांची थकबाकी प्रचंड वाढल्याचे मान्य केले. ती वसूल करण्यासाठी राज्य सरकारने धोरण लागू केले आहे. त्यानुसार एकूण थकबाकीवर ५० टक्के सूट दिली आहे. ही थकबाकीची रक्कम भरल्यानंतर त्यातील ६६ टक्के रक्कम त्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधेवर खर्च केला जाईल. मात्र वीजबिल माफ करणे शक्य नाही. त्यामुळे लोकांनी वीजबिल भरावे, अशी मागणी केली. ज्यांनी सौर पंप लावलेत त्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. २०१७ ते २०१९ आपले सरकार नव्हते, त्यावेळी त्या सरकारने वीज बिल वसुली केली नाही.मागील अनेक वर्ष शेतकरी वीज बिल वसुली करण्यात आली नव्हती. हे काम आम्हाला करावे लागणार आहे. वीज विकत घ्यावी लागते.२०१४ ला १७ हजार कोटी वीज बिल थकबाकी होती ती २०१९ पर्यंत ५६ हजार कोटींवर गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांच्या या माहितीवर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच किमान पथदिव्यांची वीज तरी कट करू नका, असे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतूनच महावितरण कंपनीला रक्कम मिळणार आहे. त्यासाठीची व्यवस्था सरकारने करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी येऊन उत्तर द्यावे तोपर्यंत ही लक्षवेधी राखून ठेवावी, अशी मागणी केली.
त्यांच्या या मागणीला पटोले यांनी तातडीने पाठिंबा दिला. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देण्याची मागणी योग्य असल्याचे सांगितले. खरे तर आपल्या मंत्र्याला सावरून घ्यायची भूमिका पक्षातील नेते घेतात. पण पटोले यांनी राऊत यांचा कोंडित पकडण्याची संधी सोडली नाही. सभापतिपदाच्या खुर्चीवर या वेळी काॅंग्रेसचे कुणाल पाटील बसले होते. त्यांना स्वतःच्या पक्षातील या दोन नेत्यांतील संबंध माहीत असल्याने हा विषय़ वाढणार नाही, याची काळजी घेतली आणि पुढची लक्षवेधी पुकारत राऊत यांची सुटका केली. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्यातील क्राॅस कनेक्शन थांबले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.