नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केली आहे. तर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मुद्दाही अद्याप निकाली निघालेला नाही. हे दोन प्रमुख मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कानावर घातले. पण याबाबत पंतप्रधान मोदी काहीच बोलले नाही, असं पवारांनीच सांगितलं.
पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वीच बारा आमदारांबाबतच पवार मोदींना भेटले असावेत, असं माध्यमांना सांगितलं होतं. अखेर शरद पवारांनीच पत्रकार परिषदेत त्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या बाबतीत चर्चा झाली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यपालांची तक्रार केली असून त्याबाबत पंतप्रधान मोदी विचार करुन योग्य तो निर्णय घेतील, असेही पवार म्हणाले. या सोबतच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईबाबत चर्चा झाली असून ही कारवाई कशासाठी याबाबतही आपल्यामध्ये चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील केंद्रीय तपाय यंत्रणांच्या कारवाया, नवाब मलिक यांच्याविरोधातील कारवाई किंवा अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राऊतांवरील कारवाई आणि बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मोदींकडे उपस्थित केल्यानंतर त्यांनी यावर काय उत्तर दिले, असं पवारांना पत्रकारांनी विचारले. त्यावर मोदी काही बोलले नाहीत, असं पवार म्हणाले. त्यांनी यावर उत्तर द्यावे, असं आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण आमची जबाबदारी म्हणून आम्ही हे मुद्दे त्यांच्या कानावर घातले आहेत. आता ते याचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेतील, असंही पवार म्हणाले.
2024 मध्ये मविआ सरकार
राज्यातील सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करून पवार म्हणाले, सरकारला कोणताही धोका नाही. पुढील अडीच वर्ष सरकार सत्तेत राहील आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळेल, असं पवारांनी स्पष्ट केलं. भाजपच्या नेत्यांकडून सतत महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची वक्तव्य केली जात आहेत. यापार्श्वभूमीवर विचारले असता पवारांनी हे स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.