
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी ( ता. ३१) बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या या बैठकीत प्रत्येक मंत्र्याच्या विभागातील कामकाजाची ते माहिती घेणार आहेत.
राज्यातील मंत्री, पालकमंत्री अथवा जिल्ह्यांचे संपर्कमंत्री यांच्या कामाबाबत आढावा तसेच पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच्या ध्येयधोरणांवर साधकबाधक चर्चा बैठकीत होईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.
पवार हे या निमित्ताने कोरोना काळात पक्षाच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षाच्या वाढीबद्दल माहिती घेणार आहेत. संबंधित मंत्र्यांच्या विभागांनी जनहिताचे कोणते निर्णय घेतले, कोणते घेणे आवश्यक आहेत, यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजपात सुरू असलेला संघर्ष आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर ईडीने सुरू केलेली कारवाई याबाबतही शरद पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडीच्या रडारवर आलेले परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. या दोघांमधे सुमारे तासभर चर्चा झाली. ईडीच्या कारवाईबाबत काय भूमिका घ्यावी यावर दोघांमधे चर्चा झाल्याचे समजते.
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूने सुरू आहे. परमबीरसिंग हे वाझे प्रकारणात नंबर एकचे आरोपी असल्याचे सिद्ध होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर मात्र तडकाफडकी छापे टाकत कारवाई होते. यामागे भाजपचे राजकारण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.