Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांची नवी खेळी, विधानसभेला दादा बारामतीच्या रिंगणाबाहेर?

Ajit Pawar Assembly Election : कोणत्याही क्षणी निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. मात्र, अजितदादा आपली भूमिका काय आणि कशी घेतील, याकडे लक्ष राहणार आहे.
ajit pawar (5).jpg
ajit pawar (5).jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरही फुटीरांना धडा शिकविण्याचा इरादा लोक अजूनही बोलून दाखवत आहेत. परिणामी, भाजपच्या वळचणीला जाऊन सत्तास्थानावर बसलेली शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे.

बारामतीत काही करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) राजकारणाला मोठा ब्रेक लावण्याची खेळी भाजपने अजित पवारांना ( Ajit Pawar ) ताकद देऊन केली. मात्र, बारामतीत अजितदादा, फडणवीसच काय, भाजपच्या महाशक्तीचीही डाळ शिजली नाही. या निवडणुकीत भाजपला नव्हे अजितदादांच्या राजकारणाला मोठा दणका बसलाय.

निवडणुकीत सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) दीड लाख मतांनी विजयी झाल्या आणि तेवढ्याच मतांनी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. प्रचंड ताकद लावूनही बारामतीत हार झाल्यानंतर अजितदादांना 'बॅकफूट'वर येण्याची चिन्हे आहेत. त्यातच, लोकसभा निवडणुकीत साऱ्या बाजूने घेरण्याच्या चाली रचलेल्या विरोधकांना पवारसाहेब काही सोडण्याची शक्यता नाही.

याच भावनेतून आता अजितदादा बारामतीतून ( Baramati ) विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. याबाबतची घोषणा अजितदादा कुठल्याही क्षणी जाहीर करू शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, अजितदादा आपली भूमिका काय आणि कशी घेतील, याकडे लक्ष राहणार आहे. त्यामुळे बारामतीतील अजितदादांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळ कान लावून राहणार आहे.

ajit pawar (5).jpg
Assembly Election 2024 : राज्यात 'मविआ' महायुतीला धूळ चारणार, महाराष्ट्राचा कौल पवार, ठाकरेंच्या बाजूने

परंतु, बारामतीतील लोकांचा मूड लक्षात घेऊन अजितदादा न लढण्याचा पवित्रा घेऊन, बारामतीकरांवर भावनिक जाळे टाकतील, असेही बोलले जात आहे. तसे झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत पवारसाहेबांकडून युवा नेते, युगेंद्र पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राजकारणात या शक्यता वाढत असल्या तरीही, अजितदादांच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष राहील आणि या निवडणुकीत फुटीरांना अद्दल घडविण्यासाठी कसा डाव टाकणार, हे पाहणे खूप महत्त्वाचे राहणार आहे.

बारामती जिंकल्याशिवाय महाराष्ट्रातील निकालाचा आनंद होणार नाही, असे सांगून लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बारामतीवर डोळा ठेवला होता. त्या निवडणुकीत हरल्यानंतर या निवडणुकीत म्हणजे, 2024 मध्ये भाजपने अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना तिकीट दिले.

या निवडणुकीत सुळेंना पराभूत करण्याच्या हेतूने राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची ताकद लागलीच. त्यानंतरही कमी की काय म्हणून, केंद्रातील भाजपनेही वाटेल त्या मार्गाने बारामती जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु, पवारसाहेबांच्या डावपेची राजकारणात भाजपला पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागले. या निवडणुकीत पवारसाहेबांना संपवायचे, सुळेंना हरवायचे, त्यासाठी कोणत्याही टोकाला जायचे, या भाजपच्या कृत्याला बारामतीतील लोकांनी जबरदस्त उत्तर दिले आणि सुळेंना जिंकवले.

ajit pawar (5).jpg
Mahayuti News : एकनाथ शिंदे अन् अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झालं का? सर्व्हेतून मोठी बाब समोर

या निकालाने अजितदादांना मोठा हादरा बसला. त्यापलीकडे विधानसभेच्या निवडणुकीतही अजितदादांना घेरण्याच्या हेतूने युगेंद्र पवारांना मैदानात आणण्याची चाल खुद्द पवारसाहेब खेळू शकतात, हेही गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. त्यामुळे अजितदादा नवी चाल खेळण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. अर्थात, या निवडणुकीत बारामतीतून न लढता राज्यातील पक्षाच्या इतर उमदेवारांसाठी झटण्याचा आणि राज्यातील तेही महायुतीत आपले नाणे खणखणीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील, असे सांगण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड राहिले तरीही, विधानसभेच्या निवडणुकीत मात्र, महायुतीला पुन्हा एकदा जोर का झटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे आता सावध होऊनच शिंदे, फडणवीस आणि अजितदादा आपली पावले टाकणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com