मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आले. त्यांनी राजकीय भूमिका उघडपणे मांडल्याने हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला असून अनेकांनी वाहिनीच्या या भूमिकेवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका केली आहे. तसेच जर जर किरण माने दोषी असतील तर शरद पोंक्षे (Sharad Ponkshe), विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मराठी (Marathi) मालिका आणि चित्रपट सृष्टी आजही परंपरागत सनातनी वर्चस्वाखाली असल्याचे परखड मत व्यक्त केलं आहे. हुकूमशहा आणि त्यांची पगारी पिलावळ अतिशय भेकड असतात. सत्याला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नसते. आणि मग आपले विरोधक, कसे देशद्रोही आहेत असा प्रचार त्यांच्याकडून होतो. किरण माने यांच्या सारखी गत उद्या आणखी कोणाची होऊ शकते. नॉट इन माय बॅक यार्ड, ही मनोवृत्ती आता ठेवून चालणार नाही. किरण माने यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे..उद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या साठी गरजेचे आहे, असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड फेसबुकवर व्यक्त केलेलं मत जसंच्या तसं...
सांस्कृतिक दहशतवाद
कोणतीही कला असो, तिच्यावर निर्बंध आले की , समाजाची निकोप सांस्कृतिक वाढ होत नाही. राज्यसत्ता, धर्म, धर्ममार्तंड यांनी आपल्याला त्रासदायक असणाऱ्या अभिव्यकतीना चेपून टाकले, हे वेगळ्याने सांगायला नको. युरोप इंग्लंड पासून पार भारत देशात हे वागणे नवे नाही. मग तो विषाचा प्याला पिणारा सॉक्रेटिस असो अथवा आयुष्यभर अपमानाचे जिणे पेलणारे ज्ञानेश्वर असोत. सांस्कृतिक दडपशाही नवी नाही. तालिबानी विचारांना आपण हसतो पण त्यासारखे वागणे आपल्या देशात घडतेय याबद्दल सोयीस्कर मौन बाळगले जाते.
साधारणपणे २०१३ पासून विरोधी विचार म्हणजे देशद्रोह ही भावना देशभरात प्रखर झाली आणि अनेकांना देशद्रोही ठरवण्यात आले. त्यात विद्यार्थी, शास्त्रज्ञ, लेखक, वेगवेगळ्या क्षेत्रातील कलावंत होते. देशातील सांस्कृतिक दडपशाही बद्दल आवाज उठवणाऱ्या कलावंतावर गलिच्छ टीका केली गेली, शिव्या, धमक्या दिल्या गेल्या. अगदी खून पण केले गेले, कलबूर्गी, डॉ दाभोलकर, गौरी लंकेश..आता यापुढे अजून एक प्रकार घडलाय. विद्यमान सरकारच्या धोरणावर नाराजी, टीका केली म्हणून किरण माने या कलावंताला स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकले.
कलावंताला कामावरून कमी करणे हे चित्रपट, किंवा नाट्यक्षेत्रात तसे नवे नाही पण किरण माने यांना ज्याप्रकारे काढले गेले ते अतिशय निषेधार्ह आहेत. कोणताही विरोधी विचार आम्ही ऐकून घेणार नाही, ही हुकूमशहा मनोवृत्ती यातून दिसते. स्टार वाहिनीवर किंवा त्या मालिकेच्या निर्मात्यावर, कोणता दबाव आणला गेला, की पुढील घटना वाईट होतील, या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलले, याची कल्पना नाही. इथे मुद्दा असा की पंतप्रधान मोदी, भाजप आणि त्यांचे पित्ते यावर किरण माने यांनी नाराजी व्यक्त केली. त्यात कोणतेही अर्वाच्य शब्द, घाणेरडी भाषा नव्हती. सोशल व्यासपीठावर ते व्यक्त झाले. तिथे जाऊन त्यांना त्यांचे मत चुकीचे कसे आहे, हे दाखवता येऊ शकले असते. पण असे न करता माने यांच्या उपजीविकेच्या स्तोत्रावर हल्ला केला गेला.
गंमत अशी की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे, याला हुतात्मा करणारे, त्याचे गोडवे गाणारे शरद पोंक्षे, विक्रम गोखले, आदरणीय कंगना राणावत असे अभिनेते आहेत. पण त्यांच्यावर कोणीही कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही. याचा दुसरा अर्थ काय? सध्या दडपशाही याला देशभक्ती समजली जाते. इथे एक उदाहरण आवर्जून द्यावेसे वाटते आणीबाणीच्या काळात किशोर कुमार आणि अनेक अभिनेत्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. पण त्यांना कोणी तुरुंगात टाकले नाही. त्यावेळी सुद्धा तेव्हाच्या सरकारवर टीका करणारे अनेक कलावंत होते. ज्यांना ऐकून घेतले जायचे. त्यांच्या नागरिक म्हणून अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काला अबाधित ठेवले जायचे.
विरोधी विचार म्हणजे शत्रू नाही. हेच सध्या विद्यमान सरकार विसरले आहे. तुम्ही आमच्या बरोबर नाही, म्हणजे आमच्या विरुद्ध आहात, इतका झुंडशाही नियम सध्या प्रचलित आहे. हॉलिवूड मध्ये अनेक अभिनेते सामाजिक दृष्ट्या सजग असतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण कार्यशैलीवर मेरिल स्ट्रीप, जॉर्ज क्लूनी, रिहाना, लिओनार्दो कप्रियो, अश्या असंख्य कलाकारांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांच्या कारकीर्दीवर विपरीत परिणाम झालेला आढळून आलेला नाही.
थोडेसे परखड बोलायचे तर, एकूणच मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टी आजही परंपरागत सनातनी वर्चस्वाखाली आहे. काही छुपे तर काही उघड असतात. स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटणे, किंवा आपल्या हिताला जपण्यात चूक नाही. पण त्याचा अर्थ कणाहीन होणे बिलकुल नाही. आदरणीय दुर्गा भागवत यांनी साहित्य संमेलनात इंदिरा गांधी आणि आणीबाणी याच्याविरुद्ध अतिशय परखड मते मांडली, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व श्रीयुत पु. ल. देशपांडे यांनी पण त्याला पाठिंबा दर्शवला . पण त्यांच्यावर अशी कारवाई झालेली आढळत नाही.
इथे किरण माने हे एक प्रातिनिधिक आहेत. लोकशाहीत आपली मते मांडणे हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क या सदरात येते. आणि कायदेशीर मार्गाने उपजीविका करणे हेसुद्धा. स्टार वाहिनीने किरण माने यांना तडकाफडकी काढून, घटनेने नागरिकांना बहाल केलेल्या, स्वातंत्र्याच्या मूल्याला एका तऱ्हेने पायदळी तुडवले आहे. पंतप्रधान मोदी यांचे समर्थक असतात, तसेच त्यांचे विरोधकही आहेत. जोपर्यंत तुम्ही औचित्यपूर्ण भाषेत, तारतम्य ठेवून, योग्य टीका करता, तोपर्यंत तुम्ही कोणताही गुन्हा करत नाही. पण गेल्या काही वर्षात आमच्या सोबत नाही, मग तुम्ही आमचे विरोधक ही झुंडशाही मनोवृत्ती प्रचंड बळावली आहे. आणि त्याचे बळी, किरण माने सारखे अभिनेते ठरतात.
जर किरण माने दोषी आहेत, तर शरद पोंक्षे, विक्रम गोखले यांच्यावर कारवाई का होत नाही? ते सोडा चंद्रशेखर गोखले नावाच्या एका टूकार, खवट चारोळी प्रसवणाऱ्या, स्वयंघोषित तथाकथित साहित्यिकाने, पंजाबचे मुख्यमंत्री श्री चन्नी यांच्यावर जातीवाचक टीका केली. पण त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली आढळत नाही. एका वाहिनीचे अधिकारी आपल्या पोस्ट मधून, उघड उघड वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांचे समर्थन करतात. पण तेही सहीसलामत सुटले. तथापि किरण माने मात्र आपल्या उपजीविकेच्या व्यवसायाला मुकले. ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे. स्टार वाहिनीला नक्की भीती कशाची? त्यांना व्यवसाय मिळणार नाही? त्यांच्यावर कारवाई होणार? नक्की कशाची?
बरं किरण माने असेही जगप्रसिद्ध नाही, की त्यांच्या पोस्टमुळे काही विपरीत घडेल उठाव, क्रांती घडेल तर मग भीती कशाची? हुकूमशहा आणि त्यांची पगारी पिलावळ अतिशय भेकड असतात. सत्याला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नसते. आणि मग आपले विरोधक, कसे देशद्रोही आहेत असा प्रचार त्यांच्याकडून होतो. आणि सरकारचे पगारी ड्रोन मग तुटून पडतात. हे वेगळे सांगायला नको. जेव्हा असे वागणे घडते, तेव्हा समजावे की अस्तित्वाची भीती वाटू लागलेली आहे. किरण माने यांच्या सारखी गत उद्या आणखी कोणाची होऊ शकते. नॉट इन माय बॅक यार्ड, ही मनोवृत्ती आता ठेवून चालणार नाही. किरण माने यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे..उद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या साठी गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.