मुंबई : इंडिया गेटवरील (India Gate) 'अमर जवान ज्योती' (Amar Jawan Jyoti) आज राष्ट्रीय युध्द स्मारक (National War Memorial) येथील ज्योतीमध्ये विलीन केली जाणार आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून अनेकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांबाबत असा हिशेब करणं हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
अमर जवान ज्योतीला शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय युध्द स्मारकावरील प्रज्वलित ज्योतीमध्ये विलीन केले जाणार आहे. त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. केंद्र सरकारकडून शहीद जवानांचा अपमान करण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधीही (Rahul Gandhi) यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. 'खर्चामुळं इंडिया गेटवरील #AmarJawanJyoti विझविण्यात येत असेल तर याचं दुःख वाटतं. खर्च कमी करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. पण देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांबाबत असा हिशेब करणं हे चुकीचं आहे.. प्रतीके, स्मारके यातून आपल्या पूर्वसूरींनी केलेल्या त्यागाची जाणीव होत असते,' असं पवार यांनी म्हटलं आहे.
'हाच त्याग पाहून देशासाठी लढण्याची प्रेरणाही मिळत असते. मनात देशसेवेचं स्फुल्लिंग चेतवणाऱ्या अशा प्रतिकांना सरकारकडूनच नख लावलं जात असेल तर काय बोलणार? आज अमर जवान ज्योत विझवली तरी देशवासियांच्या मनात ती कायम तेवत राहील,' अशी भावनाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांसह सरकार आता शहीद जवानांचीही कदर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय युध्द स्मारक येथेही ज्योत आहे. आता दोन वेगळ्या ठिकाणांऐवजी केवळ युध्द स्मारकातच ज्योत अखंडपणे प्रज्वलित ठेवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युध्द स्मारकाचे लोकार्पण केले आहे. या स्मारकात विविध युध्दांमध्ये शहीद झालेल्या 25 हजार 942 जवानंची नावे कोरण्यात आली आहे. हे स्मारक 40 एकर जमीनीवर विखरलेले असून त्यासाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
पहिल्या महायुध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रिटिश सरकारने इंडिया गेटची उभारणी केली होती. त्यानंतर 1972 मध्ये 1971 च्या पाकिस्तान (Pakistan) युध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिथे अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली. या युध्दात भारताचा विजय झाला आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 26 जानेवारी 1972 रोजी या ज्योतीचे लोकार्पण केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.