फलटण शहर : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगवी (ता. फलटण) येथील स्वतःचा विक्रम विलास हा अलिशान बंगला कोरोना सेंटर म्हणून देण्याची तयारी दाखविली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना दिले आहे. रघुनाथराजे हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत.
फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. दिवसेंदिवस रूग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेत बेड मिळू शकत नाही. परिणामी रूग्ण दगावण्याची शक्यता अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये जागा उपलब्ध व्हावी. यासाठी आपला सांगवी येथील "विक्रम-विलास' हा अलिशान बंगला देण्याची तयारी दाखवली आहे.
त्यामधील खालचा मजला स्त्रियांसाठी व वरचा मजला पुरुषांसाठी देण्यात यावा, असे त्यांनी सुचविले आहे. तसेच आणखी गरज पडल्यास फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडाही देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. यापूर्वी रघुनाथराजेंनी फलटण तालुका पिंजून काढत गावोगावी प्रत्यक्ष जाऊन लोकांना कोरोनाच्या साथीत धीर दिला होता.
बाजार समितीच्या माध्यमातून लॉकडाउन काळात शहरात व गावोगावी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषधोपचाराची विशेष सोय केली होती. बाजार समितीतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, आडते, हमालांना मोफत मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले होते. लॉकडाउन काळात अडकलेल्या परप्रांतीयांना तमिळनाडूत स्वखर्चाने बसद्वारे पाठविले होते.
आता त्यांनी फलटणच्या राजघराण्याला साजेसा असा निर्णय घेत आपला सांगवी येथील विक्रम विलास हा अलिशान बंगला कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे फलटणसह जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.