मुंबई : मुंबै बॅंकेच्या (Mumbai Bank) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने महाविकास आघाडीत सध्या खूषीचे वातावरण आहे. नूतन अध्यक्ष झालेल्या सिद्धार्थ कांबळे यांनी निवड होताच थेट `सिल्व्हर ओक` गाठले आणि शरद पवार यांची भेट घेतली. दुसरीकडे बॅंकेत उपाध्यक्षपद मिळविलेल्या भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यासोबत `सागर`बंगल्याकडे धाव घेतली. तेथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संक्रातीनिमित्त तीळगूळ देत त्यांच्या शुभेच्छा घेतल्या.
मुंबई जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अध्यक्ष होण्याची इच्छा होती. मात्र त्यात त्यांचा एक मताने पराभव झाला. त्यामुळे आज फडणवीस यांच्याकडे भेटीच्या वेळी ते उपस्थित नव्हते. बॅंकेतील भाजपचे इतर संचालक मात्र आवर्जून हजर होते.
या बॅंकेच्या निकालाचे कवित्व आणखी काही दिवस चालण्याची चिन्हे आहेत. सर्वपक्षीय पॅनेल म्हणून भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र लढले. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना एकत्र आले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला विरोध करत जोरदार चकवा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव करत भाजपने लगेच त्याचे उट्टे काढले. भाजपचा अध्यक्ष झाला असता तर प्रवीण दरेकर हे फडणिवसांकडे लाड यांनाच घेऊन गेले असते. ही संक्रांत त्यांची आणखी गोड झाली असती. मात्र उपाध्यक्षपदावरच समाधान मानावे लागल्याने संक्रातीचा आनंद फिका पडला.
अशी झाली आघाडी
मुंबै बॅंकेची संपूर्ण निवडणूक सहकार पॅनेल या नावाने लढवली गेली होती. प्रत्येक पक्षाला संधी देत सहकार पॅनेल तयार झाले होते. निवडणुकीत एकत्र बाजी मारल्याने अध्यक्षपदाचा वाद होणार नाही, असे मानले जात होते. प्रत्यक्षात महाविकास आघाडीची मते भाजपवर प्रसंगी मातही करू शकतात हे लक्षात आल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने योजना आखली. एकत्र लढण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत यशस्वीपणे राबवला. तो आजचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. महाविकास आघाडीचे निवडून आलेले सदस्य एकत्र यावेत यासाठी आदित्य यांचे विश्वासू सहकारी सूरज चौहान, सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि बॅंकेचे संचालक आमदार सुनील राऊत यांच्या एकत्रित चमूने ही योजना आखली.
एका वर्षाने सेनेकडे अध्यक्षपद
आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबै बॅंक निवडणुकीत आम्ही विजय मिळवल्याचे सेना नेते बॅंक संचालक सुनील राऊत यांनी सांगितले. पुढच्या वर्षी बॅंकेचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे. अध्यक्षपदावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपला धक्का
मुंबै बॅंकेची सूत्रे प्रवीण दरेकर यांच्या हाती गेली सात वर्षे होती. त्यांनी बँकेच्या ठेवी साडेचार हजार कोटींवरून साडेसात हजारांवर नेल्या. सूत्रे हाती असल्याने काही निर्णय मार्गी लावणे त्यांना सोपे होई. आता ती संधी गेली. मजूर वर्गातली निवडणूक अडचणीत येईल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गृहनिर्माण संस्थेतूनही निवडून येण्याची सावधगिरी बाळगली. चार गटांतील सदस्य बिनविरोध निवडून आणले; मात्र आज महाविकास आघाडी एकत्र आल्याने हा प्रयत्न फसला. अध्यक्षाच्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रसाद लाड हे बाहेरून आलेले नेते आहेत; पण ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झाल्याने भाजपमधील जुने नेते नाराज होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.