Raj Thackeray On Toll : टोल नाके सरकारचे पोट भरण्याचे साधन; राज ठाकरेंनी सगळ्यांचाच हिशोब केला

Maharashtra Road And Toll : टोल नाक्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन निर्णय घेणार
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : 'सत्तेत येण्यासाठी वारंवार टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले जाते. सरकार स्थापन केल्यानंतर मात्र टोल सुरू आणि खड्ड्यांचे रस्ते हेच नागरिकांच्या नशिबात आहे,' असे हल्लाबोल करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवरील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा भाषणांचा व्हिडिओ दाखवला. आतापर्यंत हे सर्व पक्ष सत्तेत आले. मात्र, टोलबंद झाले नाहीत. टोल नाके हे सरकारचे उदरनिर्वाहचे साधन असून, ते बंद होणार नाहीत, असा घणाघात ठाकरेंनी केला. (Latest Political News)

राज ठाकरेंनी राज्यातील टोल नाक्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन निर्णय घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, अविनाश जाधव ठाण्यातील पाच टोल नाक्यांवरील टोलवाढीविरोधात उपोषणाला बसले होते. ते उपोषण मागे घेतले आहे. याबाबत राज्य सरकारकडून पत्र मिळाले असून, त्यात कुठल्या वाहनांना टोल आहे आणि कुणाला नाही, याचाही तपशील दिला. त्यानुसार टोलवसुली होत नाही. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, असेही ठाकरेंनी या वेळी स्पष्ट केले.

या वेळी राज ठाकरेंनी भाजपचे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंनीच भाषणे ऐकवली. यात सर्वांनी टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा केल्या होत्या. सत्तेत असतानाही त्यांनी टोलबंद केल्याचे दावे केले होते. मात्र, टोलचा सर्व रोख स्वरूपातील पैसा जातो कुठे? त्याच-त्याच कंपन्यांना टोलचे कंत्राट मिळते कसे? त्यातच रोड टॅक्सही वसूल केला जातो. असे असतानाही शहर आणि महामार्गावर खड्डेच असतात, मग या टोलचा उपयोग काय?, असे अनेक सडेतोड प्रश्न ठाकरेंनी उपस्थित करून तत्कालीन युती, आघाडी, महायुती, महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.

टोल नाके हे सरकारचे पोट भरण्याचे सक्षम साधन आहे, असा आरोप ठाकरेंनी केला. ते म्हणाले, टोलच्या माध्यमातून रोख पैसा जमा होतो. ते पैसे सत्ताधाऱ्यांकडे दररोज, आठवड्याला, महिन्याला येतात. त्यामुळे कुठल्याही सरकारला टोल बंद करणे परवडणारे नाही. टोल हे सरकारचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यातून तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी आतापर्यंतच्या सर्व सरकारवर केला आहे.

याबाबत ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळ घेऊन चर्चा करणार आहेत. त्या चर्चेनंतर ठाकरे मनसेच्या टोलविरोधातील आंदोलन तीव्र करणार की थांबवणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com