Mumbai News : मुंबई येथील शिवाजी पार्क येथे आज (दि.9 एप्रिल) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना बिनशर्त पाठींबा दिला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे कौतुक केले.
1. निवडणूक आयोगाला माहित आहे की निवडणूक होणार आहे. मग त्यासाठी कर्मचारी, अधिकारी का नाही नेमत विनाकारण प्रत्येक निवडणुकीत शिक्षक, डॉक्टर नर्सेस यांना कामाला का जुंपता. डॉक्टर काय येणाऱ्या मतदाराला तपासणार आहेत का, नर्सेस त्यांचे डायपर बदलणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या कामावर जा, तुम्हाला कामावरून कोण काढते ते बघतोच..
2. राज ठाकरे हे आता शिवसेनेचे प्रमुख होणार अशी चर्चा केली जाते. अरे मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असते तर तेव्हाच नसतो झालो का? तेव्हाच माझ्या घरी ३२ आमदार, सहा ते सात खासदार माझ्याबरोबर होते. मला कोणाचाही पक्ष फोडून काहीही करायचे नाही. जे काही करायचे असेल तर मी स्वत:चा पक्ष काढून करेल. हीच माझी भूमिका होती. त्यानंतरच मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अपत्य जन्माला घातले. त्यामुळे मी जो पक्ष काढला त्याचाच अखेरपर्यंत प्रमुख राहणार.
3. जागा वाटपाची चर्चा झाली. 1995 साली जागा वाटपाला बसलो होतो. दोन तू घे.. चार मी घेतो, असे मला जमत नाही. भाजप मनसेसाठी जागा सोडणार अशी विनाकारण चर्चा केली जात होती. याला कंटाळून मी अमित शहांना (Amit Shah) फोन केला. भेटू म्हणून. त्यांना भेटलो. मग निशाणीवर प्रकरण आले. माझे चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे. ते सोडून दुसऱ्या चिन्हावर निवडणूक का लढायची.
4. माझा जन्म ज्या घरात झाला. तेथे शिवसेनेचा जन्म झाला. माझ्या आयुष्यात महत्वाचा पक्ष होता, तो शिवसेना होता. १९८९ मध्ये शिवसेना, भाजपची युती झाली. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रमोद महाजन यांच्याशी संबंध आले. काँग्रेसच्या नेत्यांबरोबर भेटी होत होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजप बरोबरच.
5. गुजरात दौऱ्याला जाऊन तेथील कामाची पाहणी केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे, असे म्हणणारा मी पहिलाच होतो. त्यांच्या पक्षातील देखील कोणीही असे वक्तव्य केले नव्हते. त्यांनी केलेली विकासाची कामे पाहिल्यानंतर म्हणून मी असे म्हंटले होते.
6. नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षात जी कामे पंतप्रधान मोदी यांच्याकडून होणे अपेक्षित होते. ते झाले नाही. नोटबंदी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न वाढत गेल्याने २०१९ मध्ये मोदींना विरोध केला होता. ज्यांच्यावर आपला विश्वास, प्रेम असतो, आणि आपल्या विश्वासाला तडा जातो, असे वाटते तेव्हा मी त्याला विरोध करतोच. नरेंद्र मोदींनी काश्मिर मधून कलम ३७० हटविले त्याचे कौतुक करणारे ट्विट देखील मी केले होते.
7. नरेंद्र मोदींनी तरूणांकडे लक्ष द्यावे. आज जगात सर्वात अधिक तरूण भारतात आहे. त्यांच्या प्रश्नांकडे मोदी यांनी लक्ष दिले पाहिजे. बाकी सर्व सोडा, देशातील तरूणांकडे विशेष लक्ष द्या, अशी मागणी मोदींकडे आहे. जर हे घडले नाही. तर सर्वच गोष्टींवरून लक्ष उडून जाईल. लोकसभेत सांगितले गेले सहा लाख उद्योगपती आपला देश सोडून गेले.ही आकडेवारी अधिकृत असेल तर याकडे गांर्भियाने पाहण्याची गरज आहे.
8. महाराष्ट्राला (Maharashtra) केंद्राकडून मोठा वाटा मिळाला पाहिजे. आज केंद्राकडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कर भरतो. या तुलनेत केंद्राकडून त्या प्रमाणात वाटा राज्याला मिळाला पाहिजे. येणारी लोकसभा निवडणूक ठरविणार आहे, देश खड्ड्यात जाणार की विकासाच्या दिशेने जाणार
9. गेल्या काही महिन्यांपासून जी राजकीय उलथापालथ सुरू आहे ती अंत्यंत घातक अशी आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. सध्या राजकारणात जे सुरू आहे. त्याला कृपा करून कोणीही राजमान्यता देऊ नका, असे आवाहन यांनी मतदारांना केले.
10. देशाच्या विकासासाठी आज खंभीर नेतृत्वाची गरज आहे. विकासासाठी काही गोष्टी करणे हे महत्वाचे आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. मला काहीही नको. विधानपरिषद, राज्यसभा नको. केवळ मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या कामाला लागा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.