मुंबई : मनगटावर शिवबंधन बांधल्यावरच खासदारकी देण्याची शिवसेनेची भूमिका संभाजीराजेंना (Sambhajiraje) पटविण्याची जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत, अनिल देसाई, उदय सामंतांवर सोपवली होती. परंतु, ठाकरेंचा निरोपवजा आदेश संभाजीराजेंच्या तोंडावर उघडपणे न बोलण्यात ही मंडळी कमी पडली. (mp Sambhajiraje news update)
शिवसेना प्रवेशाऐवजी पुरस्कृत करण्यावरच राऊत, देसाई, सामंत हे संभाजीराजेंसोबत चर्चा करीत राहिले. ओबेरायमध्ये गेल्या रविवारी तासभर चर्चा करूनही संभाजीराजे ऐकत नसल्याचे गाऱ्हाणे घेऊन देसाई, सामंत 'वर्षा' बंगल्यावर परतले. त्यावर संतापलेल्या ठाकरेंनी आपले विश्वासू मिलिंद नार्वेकरांना पाठवून 'शिवबंधन' अट मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. या बैठकीतच संभाजीराजे सावध झाले आणि शिवबंधनाचा नाद सोडला. त्यानंतर मात्र राऊत, देसाईंनी गाफील ठेवल्याचा राग धरून मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संप्तत झाल्याचे दिसून आले.
राज्यसभेची सहाव्या जागा लढविण्यावर ठाम राहिलेल्या ठाकरेंनी शिवसैनिकाला खासदार करण्याचा इरादा केला होता. मात्र, संभाजीराजेंना महाविकास आघाडीने, त्यातही शिवसेनेने पुरस्कृत करण्याचा विषय पुढे आल्यानंतर राऊत, देसाई, सामंत आणि शेवाळे यांना संभाजीराजेंसोबत चर्चेला पाठविले गेले. शिवसेनेत प्रवेशाचाच विषय पटवून देण्याचा आदेश ठाकरेंनी या मंडळींना दिला होता. परंतु, या चौघांपैकी एकानेही थेटपणे शिवबंधन बांधण्याचा एकमेव पर्याय संभाजीराजेंपुढे न ठेवताच चर्चेच्या फेऱ्या उरकत राहिले. त्यात राऊत आणि देसाई हे तर गेल्या तीन-चार महिन्यांपासून संभाजीराजेंसोबत चर्चा करीत होते. तेव्हाही ठाकरे संभाजीराजेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाम होते. दुसरीकडे, शेवाळे हे गेल्या तीन महिन्यांत संभाजीराजेंना तीन वेळा भेटले. तरीही, गेल्या रविवारी शिवसेना पुरस्कृत करणार असल्याचे वृत्त पसरले आणि संभाजीराजे खूष झाले.
ठाकरेंच्या मूळ आदेशात फिरवाफिरवी झाल्यानेच हा गोंधळ झाल्याचे ठाकरेंच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही वेळातच (रविवारी, २२मे ) ठाकरेंनी संभाजीराजेंसोबतच्या चर्चेची सूत्रे आपल्याकडे घेतली आणि देसाई, सामंत यांना बोलावून संभाजीराजेंची भूमिका जाणून घेतली. त्यात संभाजीराजे प्रवेशाला तयारच नसल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर ठाकरेंनी नार्वेकरांना देसाई, सामंतांसोबत संभाजीराजेंकडे हॉटेल ओबेरायमध्ये पाठविले. थेटच निरोप देऊन परत यायचे फर्मान ठाकरेंनी नार्वेकरांना सोडले. त्यानंतरच्या संभाजीराजे आणि या तिघांमधील २० - २२ मिनिटांच्या बैठकीत नार्वेकरांनी ठाकरेंची भूमिका मांडली. त्यानंतर या तिघांनी ओबेरायमधून काढता पाय घेतला. याच बैठकीत ठाकरेंचा नेमका आदेश संभाजीराजेंपर्यंत पोचला आणि त्यांच्या उमेदवारीचे नाट्य रंगले. मात्र, या घडामोडीत राऊत, देसाई, सामंत आणि शेवाळे हे संभाजीराजेंच्या तोंडावर घडाघडा बोलू शकले नसल्याने शिवसेना आणि संभाजीराजेंच्या संघर्षात भर पडली. संभाजीराजेंची तयारी नसल्याचे दिसून येताच ठाकरेंनीही शेवटी आपला शब्द करून दाखविला आणि संजय पवार यांच्यासारख्या शिवसैनिकाला खासदारी देण्याची खेळी खेळली. पवार आणि राऊत आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.