Sanjay Raut News : तपास यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. पण माजी मंत्री हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत. संकटाशी सामना करणारे लोक आहे. ते या सर्व संकटातून बाहेर पडतील, अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर बुधवारी (दि.११) सकाळी ईडीची छापेमारी सुरु आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकऱणी ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यावर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
''गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात विरोधी पक्षनेत्यांना अटका केल्या जात आहे. त्यांच्यावर ईडी, तपास यंत्रणांच्या छापेमारी होत आहे. मीही त्यात होतो. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आम्हाला अटक झाली.
भाजपच्या काही लोकांनी हसन मुश्रीफ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. आता त्यांच्याही घरावर, मालमत्तेवर धाडी टाकल्या जात आहेत. खरंतरं शिवसेनेसोबत असताना यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावरही तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. पण सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळतो आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत दबावाचे राजकारण केले जात असल्याची टिका संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. सोमय्या म्हणाले,हसन मुश्रीफांच्या विरोधात 158 कोटी रूपयांचे पुरावे आम्ही दिले होते. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतू, शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उध्दव ठाकरे यांची तर एवढी मेहेरबानी होती की, फक्त घोटाळे करणं एवढंच ठाकरे सरकारचं काम होतं.
हसन मुश्रीफ यांनी तर आपल्या जावयाच्या कंपनीला १५०० रुपये कोटींची कामं दिली होती. त्याचीही चौकशी सुरु झाली आहे. आता सगळे घोटाळे बाहेर येणार असून आता काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी तयार राहावं असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.