Sharad Pawar : भाकरी ही फिरवावी लागते; आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे; पवारांचे मोठे विधान

Mumbai NCP : मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP) आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Sharad Pawar News : समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा. संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्ते केले.

मुंबई (Mumbai) विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP) आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ''राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी कष्ट करणारे, वेळ देणारे, लोकांमध्ये समरस होणारे हजारो कार्यकर्ते आहेत. मात्र, त्यामध्ये काही बदल करण्याचे मत काही वक्त्यांनी व्यक्त केले. १९६० मध्ये मी युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो, १९६४ मध्ये युवक काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख झालो आणि नंतर १९६६ मध्ये राज्यातील युवकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

Sharad Pawar News
Sanjay Ratu News : यापुढे संजय राऊतांवर फडणवीस, बावनकुळे बोलणार नाहीत, 'हे' आहे कारण...

आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती व संधी नसते. मात्र, निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर निश्चित मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत.

मी २६ वर्षांचा असताना १९६७ मध्ये आम्ही गोंधळ करून काही जागा तरूणांसाठी असाव्यात अशी आग्रही मागणी केली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ही भूमिका स्वीकारून काही तरूणांना संधी दिली, ज्यामध्ये माझेही नाव होते. वयाच्या २७ व्या वर्षी मी विधानसभेत निवडून आलो. तेव्हापासून आजपर्यंत अनेक संधी मिळाल्या. त्याची सुरुवात युवक चळवळीतून झाली होती. तुमचे भविष्य घडवण्याची कुवत ही तुमच्यामध्येच आहे. तुम्ही कष्ट करण्याची तयारी दाखवली की यशस्वी चित्र बघायला मिळेल यात शंका नाही, असेही पवार म्हणाले.

मी पक्षाचे प्रांताध्यक्ष, इतर नेते आणि मुंबईचे कार्याध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगणार आहे की, जे लोक संघटनेत मागील सात-आठ वर्षे एकाच पदावर काम करत आहेत, त्यात बदल करावा. युवकांना संघटनेत घ्यावे. त्यातून त्यांना कामाची संधी द्यावी. या कामातून जो आपले स्थान प्रस्थापित करेल त्याला महानगरपालिकेत संधी द्यावी.

Sharad Pawar News
Raj Thackeray : 'लाव रे तो व्हिडीओ'च्या सभांना जी धार होती ती अजूनही तशीच आहे का? कोल्हेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे स्पष्ट उत्तर...

माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरूणांमध्ये आहे. मुंबई शहरात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी हा मोठा वर्ग होता. आज तो कष्टकरी दिसत नाही, असे पवार म्हणाले.

याठिकाणी असलेल्या गिरण्या गेलेल्या दिसतात. तिथे मोठमोठ्या इमारती दिसतात. तसेच गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही. या कष्टकरी वर्गाचा शोध घ्यावा लागेल. घाम गाळण्याची संधी त्याला देण्यासाठी चित्र तयार करावे लागेल. तो बदल करण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्णय घ्यावे लागतील. या प्रक्रियेत नव्या पिढीला प्रोत्साहित करून संधी देऊ. नवीन नेतृत्व तयार करून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतोय असा इतिहास निर्माण करू, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com