Mumbai News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या फोटोवरून रंगलेले नाट्य अजूनही थांबलेले नाही. बंडखोरांनी आपला फोटो वापरू नये, असे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दरडावून सांगूनही अजित पवार गटाचे नेते मात्र पवारांचे ऐकत नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. नवे उपमुख्यमंत्री आणि आपल्या गटाचे नेते अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फुटलेल्या काही आमदारांनी जाहिरातींमध्ये थोरल्या पवारांचा फोटो वापरला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृत्तपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातील शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.
मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीत दोघांच्या फोटोच्या वर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मात्र एका चौकटीत दिसत आहे. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी स्वत: आपला फोटो न लावण्याचे आवाहन केलं असतानाही फुटीर गटातील नेते बिनदिकत्तपणे थोरल्या पवारांचे फोटो वापरत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम वाढत आहे.
काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. तरीही, अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार त्यांचे फोटो वापरणे, त्यांच्या भेटी घेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामाध्यमातून पवारांबाबत एक संभ्रम निर्माण करण्याचा डाव तर नाही ना, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेवर पवारांची किंवा राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दुसरीकडे, नागपूरमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या बॅनर्सवर “ही दोस्ती तुटायची नाय” अशी मराठी गाण्याची ओळ लिहून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच “राजकारणातील ‘दादा’ अजितदादा आणि राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस असाही मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या होर्डिंग्जवरही एका बाजूला शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.