Navi Mumbai Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने शिवसेना शिंदे गट व खासदार श्रीकांत शिंदे यांना या निर्णयाचा फायदा झाला.
मात्र आता लोकसभा निवडणुका संपून विधानसभा निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते गणेश नाईक यांनी 14 गावांचा विकासाचा मुद्दा निर्माण करत यास विरोध दर्शविला आहे.
नवी मुंबई हे नियोजित शहर आहे. महापालिकेच्या मालकीचे स्वतःचे धरण आहे. इथली कचराभूमी ही उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे 14 गावांचा निर्णय राज्य सरकार घेत असेल तर तेथील पायाभूत सुविधा, बेकायदा बांधकामांचे उच्चाटन याची तजवीज सरकारनेच करावी. मगच यासंबंधी निर्णय घेणे नवी मुंबईकरांसाठी हितावह ठरेल अशी भूमिका भाजप नेते गणेश नाईक(Ganesh Naik) यांनी मांडली आहे.
तसेच याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना या गावांसाठी एक रुपया खर्च केला तर याद राखा असा इशारा देत एक प्रकारे राज्य सरकारला आव्हान केले आहे.
नाईक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे 14 गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने या संदर्भात आमदार राजू पाटील(Raju Patil) यांची सोमवारी भेट घेत यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, भरत भोईर, ज्ञानेश्वर येनदालकर, गुरुनाथ पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
14 गावांच्या मुद्द्यावरून नाईक आणि शिंदे आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे.
आमदार पाटील म्हणाले, 14 गावांच्या बाबतीत नाईक यांच्या काही अटीशर्थी आहेत. आणि त्याची पूर्तता झाल्याशिवाय तिथे विकास काम करू नये असे त्यांचे म्हणणे असून, ते रास्त देखील आहे. 24 मार्च 2022 मध्ये लक्षवेधी म्हणून 14 गावांचा प्रश्न मी मांडला होता. त्यावेळी देखील नाईक यांनी 591 कोटी या गावांसाठी निधी मिळावा, तसेच 6 हजार 100 कोटी इन्फ्रास्ट्रक्चर साठी देण्यात यावं असे स्पष्ट उल्लेख करत पत्रव्यवहार केला होता. तीच मागणी आता ते पुढे रेटत आहेत.
ही गावे काढण्यास नाईक यांचा विरोध नाही, त्यांची मागणी रास्त आहे. मात्र निधी एकदम येऊन पडणार नाही, टप्प्याटप्प्याने येईल. मुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांनी नगर विकास खात्यातून 70 कोटी, एमएमआरडीए कडून 70 कोटी निधी देण्यात येईल हे जाहीर केले होते. त्याअंतर्गत विकास कामे सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहे.
आम्ही त्यांना समजून घेतले, तेही आम्हाला समजून घेतील. गेल्या वीस वर्षांत नवी मुंबई पालिकेत टॅक्स वाढला नाही. तेथील लोकांवर या गावांच्या विकासाचा भार पडणार नाही. याविषयी त्यांची जी भूमिका आहे त्यातील काही बाबी आम्ही त्यांच्या स्पष्ट निदर्शनास आणून देऊ. नाईक हे मावळ भूमिका घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते आमच्या समाजाचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याकडे अपेक्षेने बघतो. त्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊनच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या भागासाठी जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी प्रयत्न करू असे आमदार पाटील यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.