
बॅालीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. दिशा सालियन म़त्यू प्रकरण तापलं असताना सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणात सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध, असे त्यांनी म्हटलं आहे. सीबीआयने सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूची चौकशी बंद केली आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे भाजपाचे घाणेरडे राजकारण भाजपा वर उलटले आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच बिहार निवडणुकीत यश मिळविण्यासाठी सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यूचा भाजपाने गैरवापर केला. एवढेच नाही तर सीआरपीसीचे उल्लंघन करुन बिहार मध्ये झीरो एफआयआर नोंदवून सीबीआय कडे केस वर्ग करण्यात आली. यातून कायद्याचेही तीन तेरा वाजले. तीन तीन तपास यंत्रणा लावण्यात आल्या. जागतिक दर्जाच्या मुंबई पोलीसांची बदनामी केली गेली, अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली आहे.
मी सातत्याने हा विषय लावून धरत होतो. रिया सारख्या एका मुलीला भाजपाच्या गलिच्छ राजकारणात त्रास दिला गेला. सुशांतसिंगच्या नातेवाईकांना वेठीस धरले गेले.यातून सीबीआय व ईडीसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांचा राजकीय उपयोग होतो हे अधोरेखित झालेच पण त्यांची विश्वासार्हता ही प्रश्नांकीत झाली आहे. पालघर साधूंचे प्रकरण असो वा दिशा सालीयनच्या मृत्यूची चौकशी असो विरोधी पक्षांची बदनामी करण्याचे भाजपाचे हीन राजकारण देशासाठी किती घातक आहे हे स्पष्ट होते. शेवटी सत्याचा विजय होत असतोच! जनतेने ओळखावे, असे सावंत यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर रियाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या बॅकग्राऊंडला रियाने एक गाणं ठेवलं आहे. या इंग्रजी गाण्याचं नाव आहे सॅटिस्फाईड. म्हणजेच मी समाधानी आहे, अशा अर्थाने सुशांतची गर्लफ्रेंड रियाने पोस्ट केली आहे. अनेकांनी रिया आणि तिच्या कुटुंबाचं याविषयी अभिनंदन केलं आहे.
सीबीआयच्या तपासानुसार सुशांतच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही. 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील घरात सुशांतसिंह मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाने राजकीय वळण घेताच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने मुंबईच्या एका विशेष कोर्टात सीबीआय क्लोजर सादर केला. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट पाहून तपासाचे पुढील आदेश दिले जाणार आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहार पोलिसांनी तपास हातात घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.