बदलापूर अत्याचार प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. राज्यात अशाच प्रकारच्या घटना काही ठिकाणी घडत असल्याचे उघडकीस येत आहे. पोलिस प्रशासन यंत्रणेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, ठाकरे गटाचे मुख्यपत्र असलेल्या 'सामना'मधून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'रोखठोक'मधून कायद्या व सुव्यस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजपवर टीकास्त्र डागले आहे.
जिथे जिथे `भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते, पण महाराष्ट्रातील बदलापूर, उरण, उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नावसारख्या प्रकरणांवर भाजप व त्यांचे नेतृत्व गप्प बसते, असे राऊतांनी म्हटलं आहे.
वाराणसी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत भाजपचे जे पदाधिकारी करतात ते पुढे बलात्काराचे आरोपी होतात. भाजपच्या विकृत चारित्र्याच्या अशा किती कहाण्या सांगाव्यात? तरीही भाजपचे महिला मंडळ विरोधकांच्या घरातील लेकी, सुनांवर लक्ष ठेवते. या लेकी-सुनांवर अत्याचार होत असल्याच्या बोंबा मारत समाजमाध्यमांवर बदनामी मोहीम उघडते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या सुनेचे प्रकरण भाजपच्या महिला मंडळाने त्याच पद्धतीने हाताळले, पण स्वत: भाजपच्या दिव्याखाली पसरलेल्या अंधाराचे काय? असा रोखठोक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
बदलापूर प्रकरणातील नराधम हा हिंदूच आहे व जेथे अत्याचार झाला ती शिक्षण संस्था हिंदुत्ववाद्यांची आहे. पोलिस याप्रकरणी गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. कारण संस्था भाजपवाल्यांची होती. गृहमंत्री फडणवीस भाजपचेच. फडणवीस अशा प्रकरणात अनेकदा बोलले आहेत, “मलाही मुलगी आहे.” पण गृहमंत्री महोदय, तुमच्या मुली सुरक्षित आहेत. गरीब, मध्यमवर्गीयांच्या मुली वाऱ्यावर आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाल्यावर तुमचे पोलीस संरक्षण देत नाहीत. कारण अत्याचार करणारे तुमचे समर्थक आहेत, असे खडेबोल राऊतांनी सुनावले आहे.
महिला अत्याचाराच्या बाबतीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे दुहेरी मापदंड आहेत. बलात्कार, विनयभंग अशा आरोपाखाली अटकेत असलेल्या व त्या गुह्याबाबत शिक्षा ठोठावलेल्या अनेक आरोपींवर भाजपची खास मेहेरनजर आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने केली, पण मोदी व त्यांच्या सरकारने काहीच कारवाई केली नाही.
जगातला सर्वात मोठा बलात्कारी प्रज्वल रेवण्णा याच्या लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकात गेले व या त्यांच्या लाडक्यास शाबासकी दिली. गुरमीत राम रहिम हा बाबा भाजपचा खास प्रिय आहे. बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली हे बाबा तुरुंगात आहेत व त्यांना या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली. गेल्या दीड वर्षात हे बाबा किमान 17 वेळा बाहेर आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.